तासगाव : शक्तिपीठ महामार्गाच्या कामासाठी सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्यांच्या 19 गावांतील 7 हजार 611 शेतकर्यांची 1 हजार 320 गटातील तब्बल 717.187 हेक्टर शेतजमीन नापीक होणार आहे. महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर), तुळजाभवानी मंदिर (धाराशिव) आणि रेणुकामाता (नांदेड ) या तीन पीठांसह प्रमुख तीर्थस्थळांना जोडणार्या पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) गोवा सरहद्दीस येऊन मिळणारा 805 किलोमीटर लांबीचा शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांतून जात आहे. भूसंपादनासाठी राज्य सरकारने 24 जून रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली.
विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांदापर्यंत 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहापदरी असून 26 ठिकाणांवर इंटरचेंज असणार आहे. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग आहेत. महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अर्थातच तो वाढेलही. महामार्गासाठी 12 जिल्ह्यांतील सुमारे 8 हजार 500 हेक्टरच्या आसपास जमीन हस्तांतरित होणार आहे. महामार्ग करताना रस्त्यातील डोंगर पोखरून बोगदे निर्माण केले जाणार आहेत. अनेक ठिकाणी तर भर घालून छोट्या नद्या आणि नाले बुजवले जाणार आहेत.
शेतकर्यांनी महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. जमिनी हेच जगण्याचे एकमेव साधन आहे. शेतकर्यांच्या जमिनी यापूर्वीच गुंठ्यावर आल्या आहेत. आता उर्वरित जमिनी जर संपादित केल्या, तर शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमिहीन होऊ शकतो. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच शेतकरी आक्रमक झालेले होते. निवडणुकीत राजकीय फटका बसायला नको, म्हणून राज्य सरकारने महामार्ग करणार नसल्याची ग्वाही दिली होती. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र स्पष्ट बहुमत मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 जूनरोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूसंपादनासाठी मंजुरी देत तब्बल 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर वर्ध्यापासून कोकणातील बांद्यापर्यंत भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. एखाद्या ठिकाणचा अपवाद वगळला, तर राज्याच्या 12 जिल्ह्यांतून महामार्गास शेतकर्यांतून तीव्र टोकाचा विरोध आहे. सांगली जिल्ह्यात दिगंबर कांबळे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती स्थापन झालेली आहे. प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल, पण महामार्ग होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा संघर्ष समितीने घेतला आहे.
सांगली जिल्ह्याच्या आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज या चार तालुक्यांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. सर्वाधिक फटका तासगाव तालुक्याला बसणार आहे. या तालुक्यांतून भूसंपादन केल्या जाणार्या 373.135 हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 125 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. या शक्तिपीठ महामार्गासाठी तासगाव तालुक्यातील सव्वा लाख द्राक्ष झाडांची कत्तल करावी लागणार आहे.