shaktipeeth expressway Pudhari
सांगली

Sangli News : शक्तिपीठ महामार्गाचा सागरेश्वर अभयारण्याला फटका

राखीव क्षेत्रातून नियोजित मार्ग; वन्यजिवांसह पर्यावरणाची मोठी हानी होणार

पुढारी वृत्तसेवा

देवराष्ट्रे : शासनाने प्रस्तावित केलेल्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा फटका भारतातील पहिल्या मानवनिर्मित अभयारण्य असलेल्या सागरेश्वर अभयारण्याला बसणार आहे. नियोजित मार्ग अभयारण्याच्या राखीव क्षेत्रातून जात असल्याने वन्यजिवांसह पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने वन्यजीवप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सन 1972 च्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये वृक्षमित्र धो. म. मोहिते यांच्या संकल्पनेतून सागरेश्वर अभयारण्याची निर्मिती झालेली आहे. 10.82 चौ.कि.मी. परिसरामध्ये अभयारण्याचा विस्तार आहे. सुरुवातीला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अभयारण्याचा पाया रचला होता. मात्र वन्यजिवांसाठी भौगोलिक परिस्थिती उत्तम असल्याने नंतरच्या काही वर्षांत अभयारण्यात हरणांचे पुनर्वसन करण्यात आले.

आज अभयारण्यात चितळ, सांबर या जातींची हजारोंच्या घरात हरणे पाहायला मिळत आहेत. याशिवाय सस्तन व सरपटणारे अन्य प्राणीही मोठ्या संख्येने अभयारण्यात दिसून येत आहेत. अभयारण्यात विविध प्रकारची हजारो झाडे व औषधी वेली आहेत. अभयारण्याच्या मधून कडेगाव आणि पलूस-वाळवा तालुक्यांना जोडणारा मार्ग जात असल्याने अभयारण्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. पश्चिमेकडील भाग पर्यटकांना खुला असून पूर्वेकडील भाग मात्र प्राण्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या भागात हरणांतील सर्वात मोठे असलेल्या सांबर जातीच्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. याच राखीव भागातून नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग जात असल्याने अभयारण्याला फटका बसणार आहे. वन्यजीवप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT