Shaktipeeth Highway file photo
सांगली

Shaktipeeth Highway‌|‘शक्तिपीठ‌’चे चित्र आठ दिवसात स्पष्ट होईल

पालकमंत्री चंद्रकांत पाटील ; शेतकऱ्यांना विश्वासात घेणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्ग कोणत्या गावातून जाणार आणि किती जणांची जमीन जाणार, हे आठ दिवसात स्पष्ट होईल. सरकार शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग करेल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पालकमंत्री पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त संजीता महापात्र, पोलिस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते.

रस्ते, धरणे, विमानतळ आकाशात बांधले काय?

पालकमंत्री पाटील म्हणाले, देशात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर धरणे आणि विमानतळ बांधण्यात आली, त्यावेळी लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. जमिनी दिल्याशिवाय काहीतरी नवीन निर्माण होत नाही. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्या कालखंडात काहीतरी निर्माण करण्यासाठी जमिनी द्याव्या लागल्या आहेत. समृद्धी महामार्ग असो अथवा पुरंदर विमानतळ, त्यासाठी जमीन लागते. शेतकऱ्यांचा विरोध झाला, परंतु सरकारने मार्ग काढल्यानंतर प्रकल्प उभे राहिले. हे प्रकल्प काय आकाशात उभे राहिले नाहीत.

शक्तिपीठ महामार्ग जिल्ह्यातील कोणत्या गावातून जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्याची किती जमीन जातील, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर ज्याठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या दूर केल्या जातील. सरकार सामान्य लोकांना बरोबर घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याबाबतची दक्षता आम्ही घेऊ, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेल दरवाढ नाही; मोदींचे धन्यवाद मानले पाहिजेत

युद्ध सुरू होऊन तीन महिने झाले, जागतिक युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयाही वाढ झालेली नाही. याबद्दल मोदी सरकारचे धन्यवाद मानले पाहिजेत. भविष्यात इंधनाचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी इंधन बचत करावी. राज्यातील दहा मंत्र्यांना केंद्र सरकारची सुरक्षा आहे, त्यामध्ये माझा समावेश आहे. मी राज्यात सर्वत्र फिरतो, त्यामुळे माझ्यावर टीका होते. पण अनावश्यक प्रवास टाळला आहे, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT