कडेगाव : “जमीन आमची, निर्णय आमचा!”, “शक्तिपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे! ” अशा घोषणा देत नेवरी ते घोगाव अशी आत्मक्लेश पदयात्रा शेतकऱ्यांनी काढली. शेतकरी शेळ्या-मेंढ्या, बैलगाड्या व जनावरांसह शक्तिपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावर उतरले होते. आपल्या हक्काच्या आणि सुपीक जमिनी वाचवण्यासाठी युवावर्गही या आंदोलनात खांद्याला खांदा लावून मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.
पदयात्रेच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी बैलजोड्या, शेळ्या, मेंढ्या आणि इतर पाळीव जनावरे सोबत आणली होती. सजवलेल्या बैलगाड्या आणि जनावरांच्या गळ्यातील घंटांच्या नादाने आणि शेतकऱ्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. “जर आमच्या जमिनीच गेल्या, तर या मुक्या जनावरांना आम्ही कसे सांभाळायचे?” असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
ही पदयात्रा नेवरी येथून निघून आंबेगाव, वडीयेरायबाग, शेळकबाव, भाळवणी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव आणि कुंडल या मार्गाने मार्गक्रमण करत सायंकाळी घोगाव येथे पोहोचली. निसर्ग वाचवा, पुढच्या पिढ्यांचे भविष्य वाचवा, असा संदेश देत, जोपर्यंत सरकार हा अन्यायकारक शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करत नाही, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा संघर्ष समिती आणि उपस्थित शेतकऱ्यांनी दिला. या पदयात्रेचे नेतृत्व पलूस- कडेगाव शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीचे प्रमुख दीपक लाड, श्रीदास होनमाने यांच्यासह शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
महिलांचा पदयात्रेत सहभाग
पदयात्रेच्या निमित्ताने ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, असे संदेश लिहिलेले फलक हातात घेऊन घोषणा देत महिला रखरखत्या उन्हात उपस्थित होत्या.