विटा : पुढारी वृत्तसेवा राज्यभरातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आमदार अनिल बाबर, प्रकाश आवाडे, सुभाष देशमुख यांच्यासह एकूण सात सदस्यांचा समावेश आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील यंत्रमाग उद्योगातील अडचणींच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल असे वस्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात सांगितले होते. त्यावर आता ही लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती सहकार, पणन व वस्रोद्योग विभागामार्फत काम करणार आहे. यात अध्यक्ष म्हणून मंत्री दादा मुसे हे काम पाहणार आहेत, तर माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार रईस शेख, आमदार अनिल बाबर, आमदार प्रविण दटके आणि महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश आहे. ही समिती राज्यातील मोठ्या संख्येने यंत्रमाग असलेल्या भागांची प्रत्यक्ष पहाणी करून स्पष्ट शिफारशीसह व योजनेच्या विस्तृत स्वरूपासह ३० दिवसांत शासनाला आपला अहवाल देईल.
दरम्यान, ही राज्यातील विविध यंत्रमाग संघटनांनी सरकारला दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने त्यांच्या समस्यांचा अभ्यास करणार आहे, तसेच यंत्रमागधारकांच्या विविध संघटना, फेडरेशन यांच्याशी चर्चा करून वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज सवलत योजनेअंतर्गत यंत्रमागधारकांना ऑनलाईन नोंदणी संदर्भात येत असलेल्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणे, यंत्रमाग घटकांसाठी अल्पकालीन उपाययोजना सुचविणे, यंत्रमागासाठीच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल सुचवायचा असल्यास त्यानुसार बदलही प्रस्तावित करणार आहे.
हेही वाचा :