Sangli ZP Election Pudhari
सांगली

Sangli ZP Election : सावळज जि. प.गटासाठी चौरंगी लढत

वायफळे गणात दुरंगी, तर सावळज गणात पंचरंगी लढत

पुढारी वृत्तसेवा

- विलास साळुंखे, मांजर्डे

तासगाव तालुक्यातील सावळज जिल्हा परिषद गटामध्ये चौरंगी लढत होत दिसत आहे. आमदार रोहित पाटील यांच्या होमग्राऊंडवर राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे. वायफळे पंचायत समितीसाठी दुरंगी आणि सावळज पंचायत समितीसाठी पंचरंगी लढत होत आहे. या गणात संजय पाटील यांनी बंडखोरी केली आहे. सध्या या मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढलेला आहे. नेते मंडळींच्या जाहीर सभा होत आहेत. सर्वत्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सुरुवातीपासून सावळज जिल्हा परिषद हा आर. आर. आबा कुटुंबीयांचा घरचा मतदारसंघ आहे. आर. आर. आबा यांच्या राजकीय कारकिर्दीला या सावळज गटातूनच सुरवात झाली होती. आजपर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकीत हा गट आबा समर्थकांनी ताब्यात ठेवला आहे. विरोधकांना येथे संधी मिळालेली नाही. आबा गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार रोहित पाटील समर्थक उमेदवाराने माजी खासदार संजय पाटील समर्थक अपक्ष उमेदवारावर दणदणीत विजय मिळविला होता. त्यानंतर येथे आमदार गटाचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पाटील यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्या वेळच्या पोटनिवडणुकीतदेखील आमदार रोहित पाटील समर्थक उमेदवार विजयी झाले होते. यातून आबा गटाचे वर्चस्व कायम राहिले असल्याचे स्पष्ट झाले होते.

या जि. प. गटातील पंचायत समितीच्या सावळज गणामध्ये आबा - काका गटात लढत झाली होती. यामध्ये आमदार रोहित पाटील समर्थक उमेदवार विजयी झाले होते, तर दुसऱ्या वायफळे पंचायत समिती गणातसुद्धा आबा-काका गट समोरासमोर होते. अटीतटीच्या लढतील आमदार रोहित पाटील समर्थक उमेदवाराने विजय मिळविला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ॲड. विजय धेंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून प्रवीण धेंडे, भाजपकडून पोपट हंकारे, शिवसेनेकडून प्रशांत सदामते आणि अपक्ष चंद्रकांत सरवदे यांचे आव्हान आहे. यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे लक्ष आहे. याबाबत मतदारसंघात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. सध्या तरी या साऱ्याच भागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पंचायत समितीच्या सावळज गणामध्ये पंचरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रकाश पाटील मैदानात आहेत. शिवसेनेचे प्रमोद उगारे, भाजपचे विश्वास निकम, राष्ट्रवादीचे ऋषिकेश बिरणे आणि अपक्ष दत्तात्रय पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. या गणात आमदार रोहित पाटील समर्थक दत्तात्रय (संजय) पाटील यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे चुरस निर्माण झाली आहे. या लढतीमध्ये अंजनी, सावळज गावामधील मतदान निर्णायक ठरणार आहे. बंडखोरीचे आव्हान आमदार रोहित पाटील कसे परतवून लावणार याकडे लक्ष आहे. या मतदारसंघात मुख्य लढत आबा-काका या पारंपरिक गटातच होताना दिसत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या पक्षांनी जिल्हा परिषद गटासाठी आणि सावळज पंचायत समितीसाठी स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरविले आहेत. मात्र वायफळे पंचायत समितीसाठी उमेदवार महायुतीमधील घटक पक्षांनी दिले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT