तासगाव : सावळज (ता. तासगाव) ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या राजीनाम्याचे सत्र काही केल्या थांबायलाच तयार नाही. मंगळवारी (दि. 12) रोजी दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता. काल, गुरुवारी सोमनाथ ऊर्फ भोला कांबळे आणि सुमन चव्हाण यांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हे राजीनामे म्हणजे सत्ताधारी गटाला बसलेला दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
मंगळवारी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनोद कोळी व अविनाश म्हेत्रे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. लगेचच दोन दिवसात आणखी दोन सदस्यांनी राजीनामा दिला. दरम्यान, अगोदर ग्रामपंचायत सदस्यांच्या राजीनामा नाट्याकडे स्थानिक नेत्यांनी दुर्लक्ष केले होते. पण राजीनामा देणार्या सदस्यांची संख्या वाढू लागताच सत्ताधारी गटाचे नेते हे खडबडून जागे झाले असल्याचे समजते.
17 सदस्यसंख्या असणार्या सावळज ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटाचे 14, तर विरोधी गटाचे 3 सदस्य आहेत. आतापर्यंत पाच सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे सत्ताधारी गटाकडे आता फक्त9 सदस्यांचे संख्याबळ आहे. पदाचा राजीनामा देणार्या सदस्यांची संख्या आठपेक्षा जास्त झाल्यास ग्रामपंचायत बरखास्त होण्याची शक्यता आहे.