तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथे म्हैस धुण्यासाठी अग्रणी नदीवर गेलेल्या ५६ वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. १० ऑक्टोबररोजी घडली. बाळू लिंगप्पा हंकारे (वय ५६, रा. सावळज, ता. तासगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळू हंकारे हे जन्मतः दिव्यांग होते. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे आपली म्हैस धुण्यासाठी सावळज येथील पांढरी परिसरातील अग्रणी नदीवर गेले होते. मात्र, दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोध सुरू केला.
शोध घेत असताना त्यांचे पुतणे प्रदीप आणि अन्य नातेवाइकांना बाळू हंकारे हे नदीच्या पाण्यात तरंगताना आढळून आले. त्यांना तातडीने बाहेर काढून पाहणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची नोंद तासगाव पोलिसात झाली आहे.