सांगली : येथील मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  
सांगली

Vidhan Parishad Election : सांगलीत ९९.७६, साताऱ्यात १०० टक्के मतदान

विधानपरिषद निवडणूक : जुन्या-नव्या संबंधातून काही ठिकाणी क्रॉस व्होटिंगची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी सांगली, साताऱ्यातील केंद्रांवर पहिल्या चार तासात अवघे २९.२७, तर दुपारी २ वाजेपर्यंत ८१.५६ टक्के मतदान झाले होते. दुपारी चार वाजता मतदानाची वेळ संपली. सातारा जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले. सर्व ४७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सांगली जिल्ह्यातील ५ पैकी ४ मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. विटा केंद्रावर ९७ पैकी ९६ मतदारांनी मतदान केले. यामुळे सांगली जिल्ह्यातील टक्केवारी ९९.७६ राहिली. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी जुन्या-नव्या संबंधातून काही ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, खानापूर नगरपरिषदेचे सदस्य राजेंद्र माने यांच्या आईचे बुधवारी निधन झाले. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यामुळे राजेंद्र माने यांचे मतदान झाले नाही. सांगली जिल्ह्यात एकूण ४२३ पैकी ४२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष आणि पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी ईश्वरपूर येथील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. सांगलीत राजवाडा परिसरातील अप्पर तहसील कार्यालय येथे सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेचे सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांचे मतदान झाले. गटा-गटाने एकत्रित येऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जतच्या सदस्यांचे सांगलीत प्रथम मतदान

सांगली येथील अप्पर तहसील कार्यालयातील केंद्रावर प्रथम जतमधील सदस्यांचे मतदान झाले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आ. गोपीचंद पडळकर जतमधील भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांना घेऊन मतदानासाठी आले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास मिरज तालुक्यातील तसेच कामेरी, मणेराजुरी आणि कोकरूडच्या सदस्यांनी एकत्र येऊन मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सत्यजित देशमुख उपस्थित होते.

सहलीवरून थेट मतदान केंद्रावर

निवडणुकीत काही दगाफटका होऊ नये याची दक्षता म्हणून भाजपने जिल्ह्यातील पक्षाच्या मतदारांना गोवा सहलीवर पाठवले होते. तेथून बुधवार, दि. १७ रोजी त्यांना कोल्हापुरात आणले. तेथे भाजप व राष्ट्रवादी सदस्यांशी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजप नेत्या जयश्री पाटील, भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी संवाद साधला. बैठकीला राष्ट्रवादीचे १८ पैकी १६ सदस्य उपस्थित होते. उपमहापौर गजानन मगदूम व स्नेहल सावंत उपस्थित नव्हते. गुरुवारी सकाळी भाजप व राष्ट्रवादीचे सदस्य ट्रॅव्हल्समधून थेट सांगली मतदान केंद्रावर दाखल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT