‘कृष्णा‌’च्या निवडणुकीचे बिगुल वाजले! 
सांगली

Krishna Factory Election‌ : ‘कृष्णा‌’च्या निवडणुकीचे बिगुल वाजले!

वाळव्यात उमेदवारीसाठी होणार जोरदार रस्सीखेच : नव्या चेहऱ्यांना संधीचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

मारुती पाटील

ईश्वरपूर : सांगली - सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल व विरोधी संस्थापक पॅनेल यांच्यात थेट लढत शक्य आहे.

निवडणुकीसाठी सोमवार 18 मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 21 जूनला मतदान, तर 23 जूनला मतमोजणी आहे. कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र कराड, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव तालुक्यात विस्तारले आहे. खानापूर तालुक्यातीलही काही गावांत ‌‘कृष्णा‌’चे सभासद आहेत. सर्वाधिक सभासद संख्या कराड तालुक्यात आहे. कारखान्याचे सध्या मतदार 50 हजार 252 आहेत, तर 21 संचालक निवडून द्यायचे आहेत.

कारखान्यावर दहा वर्षे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची सत्ता आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व कृष्णा बँकेचे अध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार सुरू आहे. कारखान्याच्या 37 वर्षांच्या इतिहासातील निवडणुकांतील मताधिक्याचे सर्व विक्रम मोडीत काढत 2021 मध्ये कारखान्यावर सत्ताधारी पॅनेलने प्रथमच सुमारे 10 हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. अविनाश मोहिते यांच्या पत्नी अर्चना मोहिते या संस्थापक पॅनेलचे नेतृत्व करणार आहेत. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच महिलेच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे.

नेत्यांच्या भूमिका ठरणार महत्त्वाच्या...

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत पक्षीय अभिनिवेश नसतो. त्यामुळे वाळवा शिराळा, कडेगाव तालुक्यातील नेतेमंडळी कोणाच्या पाठीमागे राहतात, त्यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून असते. कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे आ. विश्वजित कदम, शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील या नेत्यांची निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दहा वर्षांत कारखान्याचे केलेले विस्तारीकरण, चांगला ऊस दर, ऊसतोडीतील सुसूत्रता, पाणी योजनांचे आधुनिकीकरण, सभासद, कामगारांचे प्रश्न मार्गी, या मुद्द्यांवर पुन्हा एकदा सहकार पॅनेल निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे; तर विरोधी संस्थापक पॅनेलनेही नवीन सभासदांची नोंदणी व अपात्र सभासदांचा प्रश्न, घराणेशाही, एकाधिकारशाही हे मुद्दे घेऊन मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT