Sangli Sansthan Ganpati Visarjan 
सांगली

Sangli Sansthan Ganpati Visarjan : सांगली संस्थानच्या 'बाप्पां'ना शाही थाटात निरोप

भव्य रथोत्सव, विसर्जन मिरवणुकीस सांगलीकरांची मोठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगलीच्या ऐतिहासिक श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची सांगता पाचव्या दिवशी पारंपरिक विसर्जन मिरवणूक आणि भव्य रथोत्सवाने उत्साहात पार पडली. 'गणपती बाप्पा मोरयाऽऽ'च्या जयघोषात संस्थानच्या 'श्रीं'ना शाही थाटात निरोप देण्यात आला. बाप्पाच्या दर्शनासाठी सांगलीकरांसह ग्रामीण भागातील भाविकांनी गर्दी केली होती.

दरबार हॉलमध्ये दुपारी संस्थानचे प्रमुख श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन व युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्याहस्ते निरोपाची आरती करण्यात आली. यावेळी राणीसाहेब राजलक्ष्मीराजे पटवर्धन, संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर, महापालिका आयुक्त संजीता महापात्र, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, विद्या पाटील आणि शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले आदी उपस्थित होते.

दुपारी चारच्या सुमारास विद्युत रोषणाईने व फुलांनी सजवलेल्या रथातून बाप्पाची मिरवणूक राजवाडा चौकात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी युवराज आदित्यराजे पटवर्धन व जयदीप अभ्यंकर होते. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांची प्रात्यक्षिके, झांजपथक, लाठी-काठीचे खेळ, बैलगाडी व बँडच्या निनादात मिरवणूक मार्गस्थ झाली. 'नादप्रतिष्ठा' आणि 'संत बाळुमामा' ढोल-ताशा पथकांनी मिरवणुकीचा उत्साह वाढवला. यावेळी महापुरुष व देव-देवतांची रूपे साकारलेली शाळकरी मुले विशेष आकर्षण ठरली.

राजवाडा चौक, पटेल चौक आणि गणपती पेठेतून मिरवणूक गणपती मंदिरात पोहोचली. मार्गावर भाविकांनी फुले, पेढे व खोबऱ्याची उधळण केली. मंदिरात विजयसिंहराजे पटवर्धन व आदित्यराजे पटवर्धन यांच्याहस्ते पुन्हा आरती करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत श्रींची मूर्ती टिळक चौक मार्गे कृष्णा नदीवरील सरकारी घाटाकडे नेण्यात आली. अनेक वर्षांची परंपरा जपत सजवलेल्या नावेतून बाप्पाची मूर्ती नदीपात्रात नेऊन विधिवत पूजेनंतर विसर्जित करण्यात आली. यावेळी जोरदार आतषबाजी करण्यात आली.

अभिनेत्री भाग्यश्री यांची मिरवणुकीकडे पाठ

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी संस्थानचे प्रमुख विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या कन्या, अभिनेत्री भाग्यश्री यांनी परस्पर गणपती मंदिरात आरती केल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये त्या सहभागी झाल्या नाहीत.

आंबी कुटुंबीयांकडून ‘श्रीं’चे विसर्जन...

संस्थानची उत्सवमूर्ती विद्युत रोषणाई केलेल्या नावेतून नदीच्या मध्यभागी नेण्यात आली. त्यानंतर गणपती संस्थानचे मानकरी गजानन आंबी, विश्वेश आंबी, विजय आंबी, महादेव आंबी आदींनी आरती करून ‘श्रीं’चे विसर्जन केले. आंबी कुटुंबीयांना हा परंपरागत मान असून, यामध्ये यंदा त्यांची चौथी पिढी सहभागी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT