सांगली ः जिल्हाधिकार्यांचा बंदी आदेशाचे उल्लंघन करून शहरात दुपारी डीजेचा दणदणाट सुरू होता. अखेर संजयनगर पोलिसांनी धाव घेत दोन टॉप व एक अॅम्प्लीफायर, असे 1 लाख 15 हजारांचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी डीजेचालक विष्णू बाबुराव देवकाते (वय 40, रा. गजानन कॉलनी, जुना कुपवाड रस्ता, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, सांगली पोलिसांनी डीजेविरोधात मोहीम उघडली आहे. सणासुदीच्या काळात ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्पष्ट सूचना सर्व प्रभारी अधिकार्यांना दिल्या आहेत. त्यातच जिल्हाधिकार्यांनी दि. 1 ते 16 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्याच्या हद्दीत वाद्ये वाजविण्यावर बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करून संशयित विष्णू देवकाते याने रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास कुपवाड येथील गजानन कॉलनी येथील हनुमान मंदिराच्या गल्लीत मोठ्या आवाजात दोन सब टॉप असलेला ध्वनिक्षेपक लावला होता. याबाबत आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी 112 या मदत क्रमांकाकरून तक्रार केली. त्यानंतर हा कॉल शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. अखेर संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ध्वनिक्षेपक लावल्याची बाब समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक लाख 15 हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी विष्णू देवकाते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.