pudhari photo
सांगली

Sangli Crime : साखराळे येथे दोन गणेश मंडळांत जोरदार हाणामारी

फटाके उडवण्यावरून तलवार व रॉडने हल्ला, सहा जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : गणेशोत्सवादरम्यान फटाके उडवण्याच्या किरकोळ कारणावरून साखराळे (ता. वाळवा) येथे दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी रात्री हाणामारी झाली. या धुमश्चक्रीत तलवार व लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघांसह एकूण सहा जण जखमी झाले आहेत. ऐन उत्सवात घडलेल्या या प्रकाराने गावात खळबळ उडाली होती.

अरविंद जगन्नाथ पाटील (वय ४०), शारदा जगन्नाथ पाटील (वय ६५), ज्योती अरविंद पाटील तसेच मंडळाचे कार्यकर्ते दीपक सर्जेराव पाटील आणि शुभम सुतार (सर्व रा. साखराळे) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी कुमार सुतार, अनुज सुतार, सागर सुतार आणि गणेश माने या चार संशयितांवर प्राणघातक हल्ला, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि घातक शस्त्रांचा वापर केल्याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी अरविंद पाटील यांनी बुधवारी रात्री फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास दीपक पाटील, शुभम सुतार व इतर कार्यकर्ते त्यांच्या गणेश मंडळात थांबले होते. त्यादरम्यान दुसऱ्या मंडळाचे कार्यकर्ते ट्रॅक्टरमधून गणपती घेऊन जात असताना रस्त्यावर फटाके फोडण्यात आले. या फटाक्यांमुळे दीपक भाजले, तर एका महिलेची साडी जळाली. यावरून दोन्ही गटांत तीव्र वाद झाला.

यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरती सुरू असताना सर्व संशयित हातात तलवार व लोखंडी रॉड घेऊन दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी अरविंद पाटील यांना लक्ष्य करत तलवार व रॉडने वार केले. हा वार अडवताना शुभम सुतार जखमी झाले. हल्लेखोरांनी अरविंद यांच्या डोक्यात रॉड मारला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या अरविंद यांच्या आई शारदा व पत्नी ज्योती यांच्यावरही रॉडने हल्ला करण्यात आला. यात दीपक पाटील हेदेखील तलवारीच्या वार झाल्याने जखमी झाले आहेत.

शिवीगाळ, दमदाटी करत पोबारा

गावातील हाणामारीची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी धावले. जमाव पाहून संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करत तेथून पोबारा केला. सर्व जखमींवर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT