Leopard Attack Pudhari
सांगली

Sangli Leopard Attack: सागाव परिसरात बिबट्याची दहशत कायम

सलग दुसऱ्या दिवशी पाळीव कुत्र्यावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये घबराट

पुढारी वृत्तसेवा

मांगले : सागाव (ता. शिराळा) येथे पाच शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने निवासी क्षेत्रातील पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सागाव आणि परिसरात सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

सागाव येथील शेतकरी अक्षय पाटील यांच्या पाच शेळ्यांचा बिबट्याने बळी घेतल्याची घटना नुकतीच घडली होती. यानंतर मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सागाव-नाटोली रस्त्यालगत असलेल्या जितेंद्र शिवाजीराव देशमुख यांच्या घराच्या आवारात बिबट्याने शिरकाव केला. तेथे बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, घरातील नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे व त्यांनी केलेल्या मोठ्या आरडाओरड्यानंतर बिबट्याने कुत्र्याला सोडून अंधारात पळ काढला.

गेल्या काही दिवसांपासून सागाव, कणदूर, पुनवत, शिराळे खुर्द आणि फुपेरे या परिसरात बिबट्याने मोठी दहशत माजवली आहे. सातत्याने पाळीव जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिक व शेतकरी वर्ग भयभीत झाला असून वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT