सांगली

Sangli News: ग्रामीण भागातील लोडशेडिंग, जलजीवन मिशनवरून वादंग

विविध प्रश्नांवरून अधिकारी धारेवर; 'दिशा' बैठकीमध्ये ५१ विकास कामांचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : ग्रामीण भागात लोडशेडिंग, जलजीवन मिशनच्‍या अपुऱ्या कामावरून दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वसगडे येथील रेल्वे आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. शुक्रवारी सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत तब्बल ५१ विषयांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) सभा झाली. अध्यक्षस्थानी खासदार विशाल पाटील होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध केंद्र व शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसेच वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, रेल्वे सुरक्षा, वन्यप्राण्यांचा उपद्रव, घरकुल योजना, रस्ते, गॅस पुरवठा आदी लोकहिताच्या विषयांवर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळेत होणाऱ्या भारनियमनाबाबत सदस्य संतप्त झाले. नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन भारनियमनाचे वेळापत्रक बदलण्याच्‍या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच वीजपुरवठ्याचे नियोजन सर्व भागांमध्ये समतोल पद्धतीने करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

आमदार विश्वजित कदम यांनी, वसगडे येथील रेल्वे आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला. आंदोलन झाले, शेतकऱ्यांना मदतही मिळाली असताना गुन्हे तसेच का ठेवण्यात आले आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना तपासणी करून गुन्हे मागे घेऊ असे सांगितले.

आमदार सत्यजित देशमुख यांनी वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत, आमदार सुहास बाबर यांनी पशुधनासाठी मिनरल मिक्श्चर योजनेला अधिक निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच घरकुल योजनांसाठी वाळू अथवा पर्यायी कृत्रिम वाळू उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली. ग्रामीण विकास विभागाच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर यांनी स्वागत केले. बैठकीस लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT