विटा : 'आरटीजीएस'द्वारे पैसे देतो, असे सांगून तब्बल २२ किलो २९१ ग्रॅम वजनाची चांदी आणि पूर्वीच्या व्यवहारातील ५५ हजार रुपये अशी सुमारे ४८ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोने-चांदी व्यापारी अभिजित जालिंदर गुजर (वय ३६, रा. विटा, मूळ रा. सांगोले, ता. खानापूर) यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरून संशयित निवास नारायण जाधव व त्यांचा मृत मुलगा शिवम निवास जाधव (दोघे रा. घोटी बुद्रुक, ता. खानापूर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, विट्यात बसस्थानकासमोर अभिजित गुजर यांचे सराफी दुकान आहे. ४ एप्रिलच्या दरम्यान संशयित जाधव यांनी गुजर यांच्याकडून चांदी वेळोवेळी खरेदी केली. त्यावेळी जाधव यांनी या चांदीची रक्कम आरटीजीएसद्वारे देतो असे सांगून माल ताब्यात घेतला. मात्र, त्यांनी चांदीची रक्कम आणि जुनी शिल्लक ५५ हजार रुपये अशी एकूण ४८ लाख ८० हजार रुपयांची रक्कम गुजर यांना दिली नाही.
दरम्यानच्या काळात संशयित निवास जाधव यांचा मुलगा शिवम याचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजर यांनी निवास जाधव यांच्याकडे थकीत रकमेची मागणी केली असता, त्यांनी वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभिजित गुजर यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.