दिघंचीत घरमिळकत व्यवहारात १० लाखांची फसवणूक file photo
सांगली

Sangli Fraud : दिघंचीत घरमिळकत व्यवहारात १० लाखांची फसवणूक

न्यायालयात दावा प्रलंबित असलेली मिळकत विक्रीचे आमिष

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : दिघंची येथील घरमिळकत खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याचे आमिष दाखवून ७२ वर्षीय शेतकऱ्याची तब्बल १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उन्मेष गणपतराव देशमुख (रा. दिघंची, ता. आटपाडी) याच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शामराव कलाप्पा बाड (वय ७२, रा. विठ्ठलापूर, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

संशयिताच्या मालकीची दिघंची येथील सिटी सर्व्हे क्रमांक १५६६, १५६८ आणि १५६९ मधील घरमिळकत खरेदीखत करून देण्याचे आश्वासन संशयिताने फिर्यादीला दिले होते. मात्र, या मिळकतीबाबत आटपाडी न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्रमांक ६६/२०२५ प्रलंबित असल्याची बाब फिर्यादीपासून लपवून संशयिताने हा व्यवहार केल्याचा आरोप आहे.

या व्यवहारापोटी संशयिताने फिर्यादीकडून ३ लाख ३५ हजार रुपये रोख स्वरूपात, तर ६ लाख ६५ हजार रुपये जिल्हा बँकेच्या दिघंची शाखेतील स्वतःच्या खात्यावर जमा करून घेतले. अशा प्रकारे एकूण १० लाख रुपये स्वीकारूनही संशयिताने अद्याप खरेदीखत करून दिले नाही. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक धनश्री करंजकर तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT