बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथील खालसा धाब्यासमोर अचानक बैल आडवा आल्याने चारचाकीला अपघात झाला. शनिवारी दुपारी घडलेल्या या अपघातात सुदैवाने चारचाकीतील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, बैलाला धडक बसल्याने चारचाकीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना खालसा धाब्यासमोर अचानक बैल रस्त्यावर आडवा आला. चालकाने प्रसंगावधान राखत चारचाकी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारचाकीची बैलाला धडक बसली. या धडकेत चारचाकीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
सुदैवाने या घटनेत चारचाकीतील कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर भटक्या जनावरांचा वावर वाढला असून, त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गावर अचानक जनावरे आडवी येत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. संबंधित यंत्रणेने महामार्गावरील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करून वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.