Sangli accident news 
सांगली

Sangli Accident : डॉक्टरच्या भरधाव कारची धडक : एकाचा मृत्यू

चालक, मृत दोघेही कोल्हापूरचे; दुचाकीला दोनशे फूट फरफटत नेले : रेठरेधरणजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : कोल्हापूर येथील मेंदूरोगतज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांच्या भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिल्याने कोकरूड भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी प्रदीप खंडेराव कांबळे (वय 45, रा. कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पेठ - शिराळा राज्यमार्गावर रेठरेधरण येथील लोहार वस्तीजवळ धोकादायक वळणावर साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण होता की, चारचाकीने कांबळे यांना सुमारे दोनशे फूट फरफटत नेले. याप्रकरणी डॉ. वाईकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कांबळे कोकरूड येथे भूमिअभिलेख कार्यालयात परिरक्षण भूमापक होते. शिराळा भूमिअभिलेख कार्यालयातील काम आवरून ते ईश्वरपूर कार्यालयात कामासाठी दुचाकी (एम. एच 09 डीटी 2516) वरून शिराळाकडून पेठच्या दिशेने चालले होते. रेठरे धरण - शिराळा रस्त्यावरील लोहार वस्ती येथील वळणावर त्यांची दुचाकी आली असता अपघात झाला. त्यांना पेठकडून शिराळ्याकडे जाणाऱ्या कोल्हापूर येथील डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांच्या ( एम. एच 09 जीएम1378) या कारने जोराची धडक दिली. कारबरोबर दुचाकी व चालकास फरफटत नेल्याने छातीजवळ गंभीर दुखापत होऊन कांबळे यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांनी व रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी केली होती. कोल्हापूर येथील डॉ. कौस्तुभ वाईकर हे शिराळा येथील खासगी रुग्णालयात रुग्ण तपासण्यासाठी येत असताना त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी रात्री उशिरा ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT