सांगली : चालकाच्या निष्काळजीपणामुळे ट्रॅक्टरची धडक बसल्याने सायकलवरून निघालेल्या एका वृध्दाचा मृत्यू झाला. विष्णू बाबुराव सरगर (वय 65, रा. गंगानगर, वारणाली) असे मृत वृध्दाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी दुपारी 2.30 च्या सुमारास वारणाली परिसरातील रेशन दुकानासमोर घडला. याप्रकरणी अभिजित विष्णू सरगर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अभिजित यांचे वडील विष्णू सरगर हे घरी येऊन जेवण करून पुन्हा कामावर सायकलवरून जात होते. कॉलनीतील रेशनच्या दुकानासमोर ते आले असता त्यांना एका ट्रॅक्टरने (एमएच 10 एवाय 1192) धडक दिली. यामध्ये ते रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रॅक्टरचालक शिवानंद मिराप्पा माळी (वय 24, रा. सांगली - कोल्हापूर रस्ता, शिवराजनगर, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.