सांगली : सांगली जिल्ह्यातील सी.एन.जी. व एल.पी.जी. इंधनावर चालणार्या सर्व रिक्षा, त्याचबरोबर टॅक्सी (काळी-पिवळी) या वाहनांची कालमर्यादा 15 वरून 20 वर्षे करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे पंधरा हजार वाहनांना होणार आहे. या निर्णयाचे रिक्षा, टॅक्सी चालकांच्यावतीने मिठाई वाटून व गुलालाची उधळण करून स्वागत करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्राधिकरणाचे सदस्य तथा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आदी उपस्थित होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक 1 ऑगस्टरोजी घेण्यात आली. याबाबत बैठकीतील निर्णय आज, गुरुवारी जाहीर करण्यात आला. यावेळी पेट्रोल आणि डिझेल ऑटो रिक्षा मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, तत्पूर्वी त्यांनी एलपीजी अथवा सीएनजी इंधनावर रूपांतरीत केल्यास त्या वाहनांना 20 वर्षे मुदतवाढ देण्यात यावी, एलपीजी व सीएनजी इंधनावर चालणार्या ऑटो रिक्षांना मूळ नोंदणी दिनांकापासून 20 वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार, तसेच मीटर टॅक्सी व मीटर नसलेल्या जीपसदृश टॅक्सी त्यांच्या प्रथम नोंदणी दिनांकापासून 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांची वयोमर्यादा वाढविण्यात येणार, असे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना (काळी-पिवळी) दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी प्राधिकरणाने 15 वर्षे कालमर्यादा निश्चित केली होती. परंतु येथून पुढच्या कालावधीसाठी 20 वर्षे वयोमर्यादा निश्चित केल्यामुळे जिल्ह्यातील रिक्षा चालकांना त्याचा फायदा होणार आहे. या निर्णयाबद्दल स्वराज्य रिक्षा संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांचे आभार मानत, एसटी स्टँड, झुलेलाल चौक येथील एकता रिक्षा मित्र मंडळाच्या स्थानकासमोर फटाके फोडून, गुलालाची उधळण करीत, मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रामचंद्र पाटील, राजू म्हेतर, अजित पाटील, साजिद अत्तार, सलीम कुरणे आदी उपस्थित होते.