Sangli Municipal Corporation Pudhari Photo
सांगली

Sangli municipal corporation: सुधारित घरपट्टी नोटिसांचे वाटप सुरू

भांडवली मूल्यावर आकारणी : दोन लाख मालमत्ताधारकांना नोटीस

पुढारी वृत्तसेवा

सांगली : भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर (घरपट्टी) मागणी नोटिसांचे वाटप मंगळवार, दि. 19 मे पासून सुरू झाले आहे. महापालिका क्षेत्रातील 2 लाख 8 हजार मालमत्तांना या नोटिसा दिल्या जाणार आहेत. त्यावर 21 दिवसात सूचना, हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर प्रभागनिहाय सुनावणी होईल. आवश्यकतेनुसार घरपट्टी बिलात दुरुस्ती करून अंतिम बिले मालमत्ताधारकांना पाठविली जातील, अशी माहिती आयुक्त संजीता महापात्र यांनी दिली.

महापालिका क्षेत्रातील 1 लाख 61 हजार मालमत्तांना (इमारत, खुले भूखंड) भाडे मूल्य पद्धतीने घरपट्टी आकारण्यात येत होती. तत्कालीन आयुक्त सत्यम गांधी यांनी भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने प्रशासकीय ठराव झाला. त्याआधारे दि. 1 जानेवारी 2026 नंतरच्या नव्या बांधकामांना भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीच्या नोटीस लागू झाल्या.

आता आयुक्त संजीता महापात्र यांनी सरसकट सर्व मालमत्तांना भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. नवीन कर पद्धतीबाबत माहिती देण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका झाल्या. सर्व नगरसेवकांचीही स्वतंत्र बैठक घेऊन माहिती दिलेली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध संस्था, संघटनांचाही बैठक घेऊन माहिती दिली आहे. त्यामुळे भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी बिलाच्या नोटीस लवकरच निघणार, हे स्पष्ट होते.

आयुक्त महापात्र म्हणाल्या, महापालिका क्षेत्रातील सर्व 2 लाख 8 हजार मालमत्ताधारकांना घरपट्टीच्या नोटिसा देण्यास सुुरुवात केली आहे. मंगळवार, दि. 19 मे रोजी सायंकाळपर्यंत 1 लाख बिलांच्या मागणी नोटिसांची छपाई होईल. पहिल्या टप्प्यात दि. 19 मे रोजी सुमारे दहा हजार घरपट्टी बिलांची तपासणी करून त्यांचे वाटप होईल. बुधवारपासून नोटीस वाटप मोहिमेला गती येईल. मालमत्ताधारकांच्या घरी बिले पोहोच केली जातील. त्यावर 21 दिवसात हरकती, सूचना दाखल करता येतील. सुनावणी प्रभागनिहाय आयोजित केली जाईल. सूचना, हरकतींवर स्पेशन पथक नेमले जाणार आहे.

आवश्यकतेनुसार दुरुस्ती करून मालमत्ताधारकास अंतिम मागणी बिल दिले जाईल. त्यानंतर कर वसुली सुरू केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT