आटपाडी : आटपाडी तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध महसूल विभागाने कारवाई तीव्र केली आहे. शुक्रवारी पहाटे विठलापूर येथून पाठलाग करून महसूल पथकाने मासाळवाडी गावाच्या हद्दीत पिकअप वाहन ताब्यात घेतले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनांक घोष यांच्या निर्देशानुसार आणि उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शीतल बंडगर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून नियमित गस्त आणि तपासणी मोहीम राबवली जात आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. कारवाईत तहसीलदार शीतल बंडगर, ग्राम महसूल अधिकारी विनायक बालटे, महसूल सेवक संजय माने, गोरख जावीर, गणेश कांबळे आणि महसूल सहायक इस्माईल कांबळे सहभागी झाले होते.