सांगली : शहरातील अभयनगर येथे महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा बंद बंगला फोडून चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सुमारे पंधरा तोळे सोने आणि 30 हजारांची रोकड चोरीस गेली आहे. गजबजलेल्या ठिकाणी असणारा बंगला फोडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दादासाहेब भीमराव सावळजकर यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दादासाहेब सावळजकर हे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचा अभयनगर येथील माळी वस्तीतील गल्ली क्रमांक एकमध्ये बंगला आहे. दिवाळीनंतर ते कुटुंबासह सहलीसाठी गेले होते. चोरट्यांनी त्यांचा बंद बंगला हेरला. त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील पंधरा तोळ्याचे दागिने आणि 30 हजारांची रोकड लंपास केली.
सावळजकर मंगळवारी घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकल्याचे दिसून आले. चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी याबाबत संजयनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला. भरवस्तीत झालेल्या चोरीने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. सराईत चोरट्यांनी ही चोरी केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
माळी वस्तीमध्ये सीसीटीव्हीच नाहीत?
अभयनगर परिसरातील माळी वस्तीमध्ये सर्व बंगलेधारक आहेत. या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. तरीही या भागात एकही सीसीटीव्ही नाही. पोलिसांनी परिसरातील अन्य भागातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. परंतु, एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी एकही सीसीटीव्ही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शेजारी अनभिज्ञ
सावळजकर यांच्या बंगल्याला लागून आणखी एक बंगला आहे. परंतु, एवढी मोठी चोरी होत असताना शेजाऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. सावळजकर घरी परतल्यानंतरच शेजाऱ्यांना चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी कोणालाही अंदाज येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसून येते.