सांगली

Sangli Swine Flu Death: रेठरेधरणच्या अभियंत्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू

रेठरेधरण (ता. वाळवा) येथील अभियंता अमोल जयवंत पाटील यांचा गुरुवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

नेर्ले : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील अभियंता अमोल जयवंत पाटील (वय ४७) यांचा गुरुवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. मिरज येथील खासगी रुग्णालयात ते दहा दिवसांपासून होते.

अमोल पाटील यांना १५ दिवसांपूर्वी ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना प्रथम ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे न्यूमोनियासदृश लक्षणे दिसल्याने त्यांना मिरज येथे हलवले. दरम्यान, घशात आणि छातीत त्रास होत असल्याने कोल्हापूर येथेही त्यांची तपासणी केली होती.

मिरज येथील रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांच्या शरीरात एच१एन१ (स्वाइन फ्लू) विषाणूचा संसर्ग आढळला. उपचारादरम्यान प्रकृती ढासळत जाऊन गुरुवारी पहाटे त्यांचे निधन झाले. कोल्हापूर येथील उपचारादरम्यान किंवा प्रवासादरम्यान त्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.

२०१३ मध्ये दोघांचा मृत्यू

यापूर्वी २०१३ मध्ये रेठरेधरण येथील हॉटेलचालक उत्तम रामचंद्र पाटील आणि वैशाली अशोक पाटील यांचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. आता पुन्हा या आजाराने बळी घेतल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

दहा ते पंधरा दिवसांपूर्वी अमोल पाटील यांना एच१एन१ स्वाइन फ्लूच्या विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांची किडनी निकामी झाल्यामुळे प्रकृती अधिक बिघडत गेली.
- डॉ. पृथ्वीराज मेथे, वैद्यकीय अधिकारी, ब्रीदवेल हॉस्पिटल, मिरज.
रेठरेधरण येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना घरोघरी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या नागरिकांना श्वसनाचा अथवा घशाचा त्रास होत असेल, त्यांनी त्वरित आरोग्य उपकेंद्राशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रवीण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, वाळवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT