विटा : अपघातात मेढा आगाराच्या बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.  
सांगली

Sangli Accident : सायरनचे आवाज, आरडाओरडा अन् काळीज चिरत जाणाऱ्या किंकाळ्या..!

रेणावी घाटातील अपघाताने विटा शहरात धावपळ : विद्यार्थ्यांच्या काळजीने पालकांची त्रेधा

पुढारी वृत्तसेवा

विटा : एरवी प्रवाशांच्या वाहनांनी गजबजणाऱ्या विट्यातील शिवाजी चौकात गुरुवारी सायंकाळी अचानक सायरनचा आवाज घुमू लागला. एकापाठोपाठ येणाऱ्या रुग्णवाहिका, सायरनचा आवाज, त्यातून ऐकू येणारा आरडाओरडा आणि काळीज चिरणाऱ्या किंचाळ्यांनी संपूर्ण परिसर गंभीर बनला होता. ‘रेणावी घाटात मोठा अपघात झालाय!’ ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच चौकातील तरुणांनी दुचाकी व चारचाकी मिळेल त्या वाहनाने घाटाकडे धाव घेतली. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील विट्याजवळील रेणावी घाटाने आजवर अनेक अपघात पाहिले; मात्र गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास झालेला अपघात हा आजवरचा अत्यंत भीषण मानला जात आहे.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजताची वेळ. शाळा-कॉलेजीस सुटल्यानंतर शाळकरी विद्यार्थी आणि तरुण-तरुणींची विटा बसस्थानकावर नेहमीप्रमाणे गर्दी होती. साडेपाच वाजता विटा ते भिवघाट ही बस (क्र. एमएच १४ बीटी ३२५५) फलाटावर लागली. तब्बल ६० हून अधिक प्रवाशांना घेऊन ही बस भिवघाटच्या दिशेने निघाली. बस निघून १५ मिनिटे झाली. कंडक्टर विद्यार्थ्यांचे पास तपासत बसमध्ये पुढे सरकत असतानाच घाटातील उताऱ्याच्या वळणावर समोरून विजापूर-मेढा ही बस भरधाव वेगाने आली. विटा आगाराचे चालक माणिक मंडले यांनी आपली बस बाजूला घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु मेढा आगाराच्या बसने चालकाच्या बाजूने येऊन भीषण धडक दिली. यात उजव्या बाजूचा पत्रा पूर्णपणे फाटत गेला. या अपघातात दोन वृद्धांचा जागीच मृत्यू झाला. भिवघाट बसमधील प्रवासी नंदा हरिदास त्रंबके (वय ६०, रा. खानापूर) आणि मेढा बसमधील चालकाच्या बाजूला मागच्या सीटवर बसलेले धोंडिराम लक्ष्मण पाटील (वय ७८, रा. बांबवडे, जि. सातारा) हे दोघे जागीच ठार झाले.

या अपघातातील जखमींना विटा येथील ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये विजापूर येथील लिंगाप्पा सालवडगी कोळी, सदुबाई मल्लम्मा, बिराप्पा देवांनागाव, शहादुल मुल्ला, सभा रसिक मुल्ला, ऋतुजा सावंत, दीपक पवार, तुषार तरडे, भीमाबाई सुनील शिंगे, निरंजन कांबळे, नागम्मा शेकाप्पा जडगे, शेकाप्पा तिप्पना जडगे, अर्जुन सिद्धाप्पा दोडमणी यांच्‍यासह विटा येथील बळवंत आबा पवार, सावित्री गोपाळ जाधव, सुमित्रा चंदू राठोड यांचा समावेश आहे. याशिवाय खानापूर तालुक्यातील बातमीदार डी. जे. चव्हाण, बसचालक माणिक मंडले (खानापूर), वैष्णवी हणमंत पवार, साक्षी चंद्रकांत पवार (दोघी रा. ऐनवाडी), प्रतीक्षा बाळासाहेब पवार, अवंती आनंदा मुळीक, बळवंत आबा पवार (रा. रेणावी), आराध्या अर्जुन मुळीक, वर्षा लक्ष्मीकांत कुंभार (रा. रेवणगाव), अमर ईश्वर जाधव (रा. जाधववाडी), अश्विनी गजानन गवळी (रा. खानापूर) तसेच लता भंडारे (सातारा), नागनाथ दगडू पाटील (आटपाडी), निरंजन कांबळे (खेड, जि. सातारा), किशोर संतराम तरडे (बामणोली, ता. जावळी, जि. सातारा) हे जखमी झाले आहेत.

विट्याच्या ग्रामीण रुग्णालयाकडे

आणि तेथून पुढे शहरातील इतर रुग्णालयांकडे सायरन वाजवत रुग्णवाहिका शहरभर फिरत होत्या. त्यामुळे वातावरण अधिकच गंभीर झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT