Accountant File Photo
सांगली

Sangli News : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीचा मार्ग मोकळा

लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक भरतीस मान्यता

पुढारी वृत्तसेवा

जत : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी शासननिर्णय काढून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पद भरतीसंदर्भात यापूर्वी विविध शासन निर्णयांद्वारे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र, पद भरतीची प्रक्रिया आणि संचमान्यता याबाबतच्या बाबींमुळे काही ठिकाणी भरती प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या २८ मे २०२५ रोजीच्या पत्रान्वये पद भरतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्यात आली होती. आता ही स्थगिती रद्द करून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या संवर्गातील रिक्त पदे नियमानुसार भरण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. संस्थांनी प्रथम मंजूर पदांची संख्या, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची संख्या निश्चित करून आवश्यक कार्यवाही करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रिक्त पदे भरण्यासाठी प्रथम पदोन्नतीचा मार्ग अवलंबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमित नियुक्तीने कार्यरत पात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यांना पदोन्नती देण्याची कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात नमूद आहे. पदोन्नतीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास तसेच पदे रिक्त राहिल्यास अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करून उर्वरित पदे सरळ सेवेने भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सरळ सेवेने भरावयाच्या पदांसाठी संवर्गाची बिंदुनामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे, जाहिरातीचा प्रारूप संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करणे आणि जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये उमेदवारांची पात्रता, आरक्षण तसेच वयोमर्यादेच्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे सरळ सेवेने भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT