सांगलीत ‘खून का बदला खून’! 
सांगली

Sangli Crime| सांगलीत ‘खून का बदला खून’!

रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून : ​गोकुळनगरात थरार; चौघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटातून सांगलीतील गोकुळनगर परिसरात सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास थरारक घटना घडली. पूर्ववैमनस्यातून पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराचा धारदार कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. ‘खून का बदला खून’ असा हा प्रकार असल्याचे समोर आले आहे. गौरव दयानंद सर्जे (वय २२, रा. टिंबर एरिया, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पूर्ववैमनस्यातून चौघांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. रात्री उशिरा विश्रामबागच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तिघांना, तर शहर पोलिसांनी एका हल्लेखोरास ताब्यात घेतले. शुभम पाटील, राज कलादगे, विकास शेलार, संकेत कांबळे अशी चौघांची नावे आहेत. रात्री उशिरा त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

गौरव सर्जे याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल होते, तसेच त्याच्यावर हद्दपारीची कारवाईही करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी तो गोकुळनगर परिसरातून जात असताना, चौघा हल्लेखोरांनी त्याला गाठले. धारदार कोयत्याने त्याच्यावर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला गौरव रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. याच परिसरातील चैतन्य देवा तोरणे याचा दोन महिन्यांपूर्वी स्वामी समर्थ घाटावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्या खुनाचा बदला घेण्यासाठीच गौरवचा खून करण्यात आल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे गोकुळनगर परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे. नागरिकांनी भीतीपोटी दुकाने बंद केली.

घटनास्थळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक संदीप भागवत आणि निरीक्षक संजीव झाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. निरीक्षक सुधीर भालेराव, अरुण सुगावकर आणि बयाजीराव कुरळे यांच्या पथकाने प्राथमिक पंचनामा केला. घटनास्थळी मृताचे केस, मोबाईल आणि चप्पल विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. तणावपूर्ण वातावरण पाहता परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांच्या पथकाने रात्री उशिरा कारवाई करत चौघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

हत्याकांडाची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल

गोकुळनगर परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे संपूर्ण हत्याकांड कैद झाले आहे. हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरतेने केलेले वार आणि मारहाणीचा थरार सायंकाळनंतर सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून घबराट पसरली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT