सांगली ः 15 व्या वित्त आयोगाचा 2022-23 या आर्थिक वर्षांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि पाच ग्रामपंचायतींना एकूण सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चार वर्षांपासून प्रशासक होते. त्यामुळे केंद्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी राखून ठेवला होता. सध्या लोकप्रतिनिधी आल्यामुळे 2022-23 मधील पहिला व दुसऱ्या हप्त्याचा अबंधित निधी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी 5 कोटी 77 लाख 52 हजार 379 रुपये निधी प्राप्त झाला आहे. तसेच पंचायत समितींना 5 कोटी 77 लाख 52 हजार 379 आणि राडेवाडी, बांबवडे, चिखलगोठण, शिरटे आणि तांबवे या पाच ग्रामपंचायतींना 15 लाख 74 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संबंधित पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या खात्यात वर्गही करण्यात आला आहे. या निधीचा वापर प्रामुख्याने पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आदी कारणांसाठी करण्यात येणार आहे.