सांगली : बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे आणि जागतिक घडामोडींमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलथापालथ होत आहे. स्टील, सिमेंट, विटा, इलेक्ट्रिकल साहित्य तसेच मजुरी खर्च वाढल्याचा थेट परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला आहे. घरांच्या किमतीमध्ये तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष सुनील कोकितकर यांनी दिली.
अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढत आहे. त्याचा थेट परिणाम बांधकाम साहित्यावर होत आहे. घरांच्या किमती वाढल्या आहेत. वाढत्या खर्चामुळे आणि काही ठिकाणी साहित्याच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रेडाईकडून महारेराकडे (महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलेटरी ॲथॉरिटी) प्रकल्पांच्या सहा महिने मुदतवाढीसाठी मागणी केली जाणार आहे, अशी माहिती क्रेडाई सांगलीचे सचिव दिलीप पाटील यांनी दिली.
परवडणाऱ्या घरांकडे कल
जमिनींच्या किमती वाढत आहेत. पायाभूत सुविधांवरील खर्च वाढला आहे. परिणामी घरांचे दर वाढले आहेत. परवडणाऱ्या घरांसोबतच लक्झरी फ्लॅट्सकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून दुकानगाळे, कार्यालयीन जागांना मागणी वाढत आहे, असे उपाध्यक्ष उत्तम आरगे यांनी सांगितले. आयटी क्षेत्रातील अस्थितरतेमुळे मायदेशी परतणाऱ्या अभियंत्यांकडून एनआरआय गुंतवणूक, लक्झरी आणि प्रीमियम प्रॉपर्टीची मागणी वाढत असल्याचे सहसचिव धवल शहा यांनी सांगितले.
बँकांचे तुलनेने कमी व्याजदर, महिलांच्या नावावर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्क सवलत, गृहकर्जावरील करसवलती यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळत असल्याकडे संचालक संतोष अष्टेकर यांनी लक्ष वेधले. रिअल इस्टेट क्षेत्रालाही ग्राहकांच्या नव्या अपेक्षांनुसार स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक ठरत असल्याचे संचालक शैलेश पवार यांनी सांगितले.
सदनिकांचे नवे दर रुपये (कंसात जुने दर) प्रति चौ.फूट
कोल्हापूर रोड : 3600 ते 3800 (3000 ते 3400)
गावभाग, पेठभाग, खणभाग : 4500 ते 5500 (3500 ते 4500)
उत्तर शिवाजीनगर, रतनशीनगर, कॉलेज कॉर्नर : 4500 ते 5800 (4000 ते 5000)
माधवनगर रोड, चिंतामणीनगर : 3500 ते 4000 (3000 ते 3500)
बापटमळा, गुलमोहर कॉलनी : 5000 ते 5600 (4500 ते 5000)
विश्रामबाग, सांगली-मिरज रोड : 5500 ते 6500 (5000 ते 5500)
धामणी रोड : 4200 ते 4600 (3800 ते 4200)
विजयनगर, गव्हर्न्मेंट कॉलनी : 3400 ते 3800 (3100 ते 3500)
शाहूनगर, बालाजीनगर, अभयनगर :3300 ते 3800 (3000 ते 3300)
वारणाली : 3500 ते 4000 (3200 ते 3500)
मिरज शिवाजीनगर, ब्राह्मणपुरी : 4500 ते 5000 (4000 ते 4500)
मिरज सांगलीकर मळा, रमा उद्यान : 4000 ते 4800 (3500 ते 4200)
मालगाव रोड, टाकळी रोड : 3200 ते 3500 (3000 ते 3200).