सांगली : सांगलीत बेदाणा संशोधन व स्किल प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, ही मागणी शिवाजी विद्यापीठातर्फे मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे केंद्र तातडीने उभे करावे, अशी मागणीही आमदार गाडगीळ यांनी केली.
शिवाजी विद्यापीठ येथे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सिनेट सदस्यांची अधिसभा झाली. या महत्त्वपूर्ण अधिसभेस सांगली विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. सांगली जिल्ह्याची देशपातळीवर बेदाणा उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असून, बेदाणा निर्मिती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता, शिवाजी विद्यापीठामार्फत सांगली येथे बेदाणा संशोधन व स्किल प्रशिक्षण केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी आमदार गाडगीळ यांनी अधिसभेत केली. या मागणीला मान्यता देण्यात आली. लवकरच प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
जूनपासून सांगलीत तात्पुरते केंद्र
जिल्ह्यातील खानापूर तालुका येथे शिवाजी विद्यापीठाचे कायमस्वरूपी केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा, इमारत, मनुष्यबळ व इतर पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी मांडली. तोपर्यंत सांगली शहरात उपलब्ध भाड्याच्या जागेत शिवाजी विद्यापीठाचा उपपरिसर येत्या जून महिन्यापासून सुरू करून आवश्यक अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्यात यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिसभेच्या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, अधिसभा सदस्य विशाल गायकवाड, संजय परमणे, डॉ. मनोज पाटील यांच्यासह सर्व अधिसभा सदस्य उपस्थित होते.