सांगली : सांगली जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 20 टक्के अधिक पाऊस पडला असला तरी, गतवर्षाच्या तुलनेत 49 टक्के कमी पाऊस झाला आहे. शासकीय दरबारी 1 जून ते 30 सप्टेंबर असा पावसाळा गृहीत धरला जातो. त्यानुसारच ध्येय, धोरणे आखली जातात. सांगली जिल्ह्यात यावर्षी सरासरी 617.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. याची सरासरीच्या तुलनेत टक्केवारी 120.1 आहे. गतवर्षी (2024) एकूण सरासरी 869.4 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. याची सरासरीच्या तुलनेत टक्केवारी 169 होती.
यावर्षीही सर्वाधिक पावसाची नोंद ही शिराळा तालुक्यात झाली. यावर्षी याठिकाणी 1283 मि.मी. पाऊस बरसला. याची टक्केवारी 150 इतकी आहे. सर्वाधिक कमी पाऊस हा कडेगाव तालुक्यात पडला आहे. या तालुक्यात केवळ सरासरी 482.4 मि.मी. पावसाची यावर्षी नोंद झाली. या तालुक्यात केवळ 90 टक्केच पाऊस झाला. जिल्ह्यात गतवर्षी सरासरीच्या 169 टक्के पाऊस झाला होता, तर यावर्षी सरासरीच्या 120 टक्के पावसाची नोंद झाली आहे.