सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयात एन.डी.आर.एफ. पथक दाखल झाले. Pudhari Photo
सांगली

Sangli Rain Update | पावसाची उघडीप; शेतकर्‍यांना दिलासा

पेरणीचे नियोजन शक्य; एनडीआरएफ पथक दाखल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सांगलीसह जिल्ह्याच्या बहुतेक भागांत दिवसभर उघडीप दिली. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. पुढील काही दिवस पावसाची अशीच उघडीप राहिल्यास वेळेवर पेरणी करता येईल, या द़ृष्टीने शेतकर्‍यांचे नियोजन आहे.

यावर्षी मे च्या दुसर्‍या आठवड्यापासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून आहे. ओढे, नाले भरून वाहत आहेत. कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. या पावसाचा उन्हाळी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. भाजीपाल्याचे नुकसान झालेले आहे. पाऊस कधी उघडीप देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासून दिवसभर उघडीप दिली.

पावसाळा संपेपर्यंत पथक जिल्ह्यात

संभाव्य नुकसान टाळण्यासाठी, मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी.आर.एफ.) एक पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी दिली.

या पथकामध्ये पथक प्रमुखवारी व इतर 24 जवान आहेत. या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमारत कोसळल्यानंतर शोध व सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे. पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे. हे पथक मिरजेतील क्रीडा संकुल येथे थांबणार असून गरजेच्या ठिकाणी जाणार आहे. आपत्तीच्या काळात काय करावे व काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे एन.डी.आर.एफ पथकातील अधिकारी यांनी सांगितले.

जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत झालेला पाऊस मि.मी.मध्ये असा

मिरज 11.8, जत 19.2, खानापूर 17.9, वाळवा 15.8, तासगाव 10.7, शिराळा 6.7, आटपाडी 17.1, कवठेमहांकाळ 4.6, पलूस 30.9 आणि कडेगाव तालुक्यात 28.5

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT