सांगली : तब्बल पंधरा ते वीस दिवसाच्या प्रदीर्घ खंडानंतर रविवारी सायंकाळी सांगली शहरात पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या भाविकांची पावसामुळे तारांबळ उडाली. त्यांना आसरा शोधावा लागला.
गेल्या जवळपास वीस दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली होती. सांगलीत रविवारी कमाल तापमान सुमारे ३२ ते ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात सांगलीकरांना उन्हाळ्याचे चटके सहन करावे लागत होते. गेले दोन दिवस सायंकाळी ढगाळ वातावरण होत असले तरी, पाऊस हुलकावणी देत होता. रविवारी सायंकाळी पाचनंतर पुन्हा ढगाळ हवामान तयार झाले. त्यानंतर रात्री ८ वाजता शहरात तुरळक पावसाला सुरुवात झाली आणि ८.४५ वाजण्याच्या सुमारास पावसाची जोरदार सर आली.
सुमारे पंधरा ते वीस मिनिटे हा पाऊस धुवाधार कोसळत होता. पावसामुळे देखावे पाहणाऱ्या भाविकांची आसरा शोधण्यासाठी धावपळ झाली; तर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी पावसात भिजतच बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह कायम ठेवला. पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यानंतर आलेल्या या पावसामुळे सुकणाऱ्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले आहे.