सांगली

Sangli Rain : परतीच्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा

उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

सांगली-मिरज : सांगली आणि मिरज शहर परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना यामुळे दिलासा मिळाला. जिल्ह्यातही काही भागांत पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला.

शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सायंकाळी पाचनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. विजेच्या कडकडाटानंतर सायंकाळी सातनंतर तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. चार ते पाच दिवसांच्या खंडानंतर हा पाऊस झाला. तासगाव शहरासह मांजर्डे, आरवडे, चिंचणी, गोटेवाडी आणि राजापूर येथे परतीचा जोरदार पाऊस झाला. कडेगाव आणि परिसरात रात्री आठ वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. आटपाडी आणि परिसरात मात्र केवळ ढगाळ वातावरण राहिले होते.

येडेनिपाणी : परतीच्या मान्सूनने मंगळवारी सायंकाळी येडेनिपाणी परिसरात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक दिवस पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. वाळव्यातही सुमारे तासभर जोरदार सरी कोसळल्या.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह येडेनिपाणी, गोटखिंडी, इटकरे, येलूर परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप तसेच पाण्याअभावी वाळणाऱ्या ऊस पिकाला जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे नुकत्याच दाखल झालेल्या ऊसतोड मजुरांचे चांगलेच हाल झाले. तसेच सोयाबीनची मळणी करणाऱ्या शेतकऱ्यांचीही धांदल उडाली. हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

गोटखिंडी-आष्टा : गोटखिंडी, बावची, आष्टा परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दमदार पाऊस झाला. यावेळी विजांचा कडकडाट होत होता. जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. अंदाजे पाऊण तास पाऊस बरसला. शेतशिवारातील पिकांना पावसाने दिलासा मिळाला असून, पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

कुंडल : कुंडल परिसरात सोमवारी दिवसभर उन्हाच्या तडाख्यासह हवेत उष्णता जाणवत होती. सायंकाळी सातच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, पाऊस उशिरापर्यंत सुरू होता.

पलूस तालुक्यात मुसळधार

पलूस शहरासह कुंडल, रामानंदनगर, अमनापूर, बांबवडे आदी परिसरात मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पलूस शहरात तब्बल दीड तास पाऊस सुरू राहिल्याने शहरातील रस्ते पाण्याने चिंब झाले. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तसेच वाहनधारकांची तारांबळ उडाली.

मंगळवारी पलूस शहराचा आठवडा बाजार असल्याने बाजार परिसरात मोठी गर्दी होती. सायंकाळच्या सुमारास बाजारातील व्यवहार सुरू असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने व्यापारी, फळ-भाजी विक्रेते, छोटे व्यावसायिक आणि ग्राहकांची एकच धावपळ उडाली. पावसापासून माल वाचविण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याची लगबग केली. ग्राहकांनीही पावसापासून बचाव करण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला.

अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यातील खरीप पिकांना पाण्याची कमतरता जाणवू लागली होती. विशेषतः भात, भुईमूग तसेच ऊस पिकांसाठी पावसाची आवश्यकता होती. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होणार असून, पिकांच्या वाढीसाठी त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT