सांगली : सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कृष्णेसह जिल्ह्यातील सर्वच नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील राजापूर हे कृष्णा नदीवरील दोन महत्त्वाचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४१.९ मिलिमीटर पाऊस झाला. तर इतर तालुक्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप पिकांच्या पेरणीला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.