सांगली : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सांगली शहर आणि जिल्ह्यात शनिवारी जोरदार कमबॅक केले. दुपारपासून सुरू झालेली पावसाची संततधार रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः वाळवा, शिराळा, मिरज, पलूस आणि कडेगाव या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर उर्वरित तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरू होती.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. गेले काही दिवस कडकडीत ऊन असल्याने शेती कामांची लगबग सुरू होती. मात्र, शनिवारी अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. सांगली शहरात दुपारी सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शनिवारी आठवडी बाजार असल्याने विक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली. शहराच्या सखल भागांत आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचले, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आणि पादचार्यांनाही प्रचंड त्रास झाला. गटारे तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले होते.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होते. पाण्याअभावी खरिपाचा हंगाम धोक्यात येण्याची भीती होती. मात्र, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊस, मका, भात आणि हळद यांसारख्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याउलट, या पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीला आले होते किंवा काढणी सुरू झाली होती. अचानक झालेल्या पावसामुळे शेतातील काढलेले सोयाबीन भिजले, ज्यामुळे त्याचा दर्जा घसरण्याची आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्तकरत आहेत.
पुढील दोन दिवस पावसाचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पुढील दोन दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कमी कालावधीत पडणार्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.