सांगली

Pudhari Natyotsav: 'आता थांबवायचं कसं‌'च्या दमदार प्रयोगाने 'पुढारी नाट्योत्सवा'ला प्रारंभ

आज ‌'करुणाष्टके‌' तर उद्या ‌'एका लग्नाची पुढची गोष्ट‌' नाटकांचे प्रयोग

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सामाजिक वास्तवाला स्पर्श करणारे कथानक, प्रभावी संवाद आणि कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यामुळे ‌'आता थांबवायचं कसं‌', या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रभावी नाटकाच्या दमदार प्रयोगाने ‌'पुढारी नाट्योत्स‌वा’ची रविवारी उत्साहात सुरुवात झाली.

येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ गिरीश ओक, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील आणि ऐश्वर्या शेटे यांनी साकारलेल्या जिवंत अभिनयामुळे रसिक सुरुवातीपासून अखेरपर्यत रंगून गेले. या नाटकाच्या पहिल्याच दिवशी रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक मे. पी. एन. गाडगीळ सराफ आणि जव्हेरी असून ‘एलआयसी’ आणि येवलेज्‌ मिल्क कॉर्नर हे सहयोगी प्रायोजक आहेत. माई ह्युन्दाई, सांगली यांचे विशेष सहकार्य लाभले.

नाट्योत्सवाचे उद्‌घाटन 'आता थांबवायचं कसं' या नाटकाच्या कलाकारांसह प्रायोजकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ व जव्हेरीचे संचालक सिध्दार्थ गाडगीळ, एलआयसी ऑफ इंडिया सांगलीचे सीनियर ब्रँच मॅनेजर संदीप डांगळे, अभिनेते डॉ. गिरीश ओक, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील आणि ऐश्वर्या शेटे या नाटकातील कलाकारांचा दैनिक 'पुढारी' चे इव्हेंट व्यवस्थापक राहुल शिंगणापूरकर, सांगलीचे शाखा व्यवस्थापक युवराज पानारी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

नाट्योत्सवातील, दुसरा प्रयोग 'करुणाष्टके' आज-सोमवारी रात्री ८ वाजता होणार आहे. गीतांजली कुलकर्णी आणि पर्ण पेठे यांच्या प्रभावी भूमिका असलेले हे नाटक मानवी नातेसंबंध आणि भावविश्व उलगडणारे आहे. तर नाट्योत्सवाची सांगता मंगळवार, दि. १४ रोजी रात्री ८ वाजता 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाने होणार आहे. प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या प्रमुख भूमिका या नाटकाचे आकर्षण ठरणार आहेत.

सांगलीतील कार्यक्रमाच्या तिकीट बुकिंग व अधिक महितीसाठी संपर्क ९४२०७९१६२०/ ८१४९५८२४४२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT