विराज शिंदे यांच्या निवासस्थानावर मोर्चा 
सांगली

Satara News : विराज शिंदे यांच्या निवासस्थानावर मोर्चा

गद्दारीचा आरोप करत पुतळ्याचेही दहन : राष्ट्रवादी आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

वाई : सातारा जिल्हा परिषदेत सभापती निवडीवेळी झालेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद वाई शहरात उमटले. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विराज शिंदे यांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. यावेळी किसनवीर चौकात जोडे मारो आंदोलनही झाले. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला.

झेडपीतील भाजप सत्तेमध्ये महिला विकास व बालकल्याण सभापतिपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे यांची निवड झाली. राष्ट्रवादीतून निवडून आल्यानंतर सभापती निवडीवेळी भाजपच्या गोटात गेल्यामुळे ऋतुजा शिंदे यांना सभापतिपद मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत जाहीर निषेध केला. सोमवारी शहरातील किसनवीर चौकात कार्यकर्त्यांनी विराज शिंदे व ऋतुजा शिंदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत फलकाचे दहन केले. सकाळी 11 वाजता महागणपती घाट येथून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा किसनवीर चौकमार्गे विराज शिंदे यांच्या घरासमोर नेला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. राजीनामा द्या, पुन्हा निवडणुकीला सामोरे जा, अशा घोषणा देण्यात आल्या.

विराज शिंदे यांच्या घरासमोर कोपरा सभा घेतली या सभेत विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत शिंदे दाम्पत्याचा निषेध केला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रतापराव पवार, किसनवीर कारखान्याचे चेअरमन प्रमोद शिंदे, बाजार समितीचे सभापती मोहनराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मस्कर, जि. प. सदस्य बापूसाहेब शिंदे, सौ. वृषाली चव्हाण, शशिकांत पवार, माजी उपसभापती अनिल जगताप, सत्यजित वीर व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला विराज शिंदे व ऋतुजा शिंदे यांनी तडा दिल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT