उत्तम कदम
आष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या कर निर्धारण विभागाकडून मालमत्ता धारकांना दिल्या जाणाऱ्या कराच्या बिलांवर आणि पावत्यांवर असलेल्या क्यूआर कोडवर नगरपरिषदेचा अधिकृत गोल शिक्का मारण्यात आल्याने मोठा संशय निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, या पावत्या खऱ्या आहेत की बनावट, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात दक्ष नागरिकांनी थेट मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र सादर करून तत्काळ खुलासा करण्याची मागणी केली आहे.
नगरपरिषदेमार्फत शहरातील मालमत्ता धारकांना आर्थिक वर्ष २०२६-२७ ची मालमत्ता कराची बिले व पावत्या वितरित केल्या जात आहेत. या पिवळ्या रंगाच्या अधिकृत पावत्यांवर कर भरणा करण्यासाठी तसेच माहिती पडताळणीसाठी क्यूआर कोड छापण्यात आला आहे. मात्र, या क्यूआर कोडवरच नगरपरिषदेचा गोल शिक्का मारून स्वाक्षरी करण्यात आल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.
क्यूआर कोड हा मोबाईलने स्कॅन केल्यावर त्यावरून संबंधित मालमत्तेची आणि देय रक्कमेची माहिती मिळणे अपेक्षित असते. मात्र, शिक्का बरोबर क्यूआर कोडच्या मध्यभागी आणि डेटा पॅटर्नवर मारल्यामुळे हा कोड स्कॅन करण्यात अडथळे येत आहेत किंवा तो पूर्णपणे निकामी झाला आहे. त्यामुळे हा क्यूआर कोड नेमका कशासाठी दिला होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावतीवर शिक्का मारण्यासाठी आणि स्वाक्षरी करण्यासाठी इतरत्र पुरेशी मोकळी जागा उपलब्ध असतानाही, जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणाने केवळ क्यूआर कोडवरच शिक्का का मारला गेला, हा मुख्य प्रश्न आहे. या प्रकारामुळे अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. हा केवळ कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आहे?, क्यूआर कोड चुकीचा छापला गेल्याने तो लपवण्यासाठी त्यावर शिक्का मारला आहे?, की या पावत्या अधिकृत सिस्टिमममधून जनरेट न होता बनावट तयार करून त्यावर शिक्का मारला गेला आहे?, असा संशय व्यक्त केला जात आहे.