सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टी (मालमत्ता कर) थकबाकीदारांसाठी महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी 'अभय योजना' जाहीर केली आहे. आगामी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत थकीत घरपट्टीची मूळ रक्कम भरल्यास विलंब शास्तीत (दंडव्याज) १०० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महानगरपालिका क्षेत्रात सध्या ८३,७६० मालमत्ताधारकांकडे एकूण ११९ कोटी ८१ लाख ७८ हजार ४३५ रुपये इतकी मालमत्ता कराची थकबाकी आहे. यामध्ये तब्बल ४१ कोटी ७ लाख रुपयांच्या केवळ दंडव्याज रकमेचा समावेश आहे.
मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर दरमहा २ टक्के इतकी विलंब शास्ती आकारली जात असल्याने थकबाकीची ही रक्कम सातत्याने फुगत चालली आहे. वसुलीचे प्रमाण वाढावे आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. सर्व थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना सामूहिकरी्या ४१ कोटी रुपयांची सवलत मिळेल, तर महापालिकेच्या तिजोरीत थकबाकीचे ७९ कोटी रुपये जमा होतील.
दंडव्याजात सवलत अशी..!
थकीत मालमत्ता कराची रक्कम भरणाऱ्यांसाठी विलंब शास्तीत सवलत देण्यात येणार आहे. दि. १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत थकबाकी भरल्यास १०० टक्के विलंब शास्तीत सवलत मिळणार आहे. दि. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत थकबाकी भरल्यास ७५ टक्के, तर दि. १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत थकबाकी भरल्यास ५० टक्के विलंब शास्तीत सवलत मिळणार आहे.