मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील व कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. Pudhari Photo
सांगली

Devendra Fadnavis | सांगलीतील मोठे घराणे यायचे होते ते आले : मुख्यमंत्री फडणवीस

जयश्री पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

सांगली : वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. ‘सांगली जिल्ह्यातील मोठे घराणे भाजपमध्ये यायचे होते ते आले आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संदर्भातील प्रश्नावर सांगितले.

मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात बुधवारी सायंकाळी जयश्री पाटील व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सांगलीतून आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख तसेच जयश्री पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम प्रदेश अध्यक्षांच्या हस्ते होत असतो; पण महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचा वारसा असलेल्या जयश्री पाटील यांचा प्रवेश असल्याने मी याकार्यक्रमाला आवर्जून आलो.

भाजप हा एक परिवार आहे. जयश्री पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपकडून परिवारासारखी वागणूक मिळेल. भाजप प्रवेश केलेल्या सर्वांची काळजी घेणे, त्यांना योग्य संधी व जबाबदारी देणे हे आमचे कर्तव्य आहे.काँग्रेसमधील नेतृत्व दिशाहीन झाले आहे. काँग्रेसने देशहित, समाजहित याला बगल दिली आहे. काँग्रेसमध्ये सामान्यांशी जोडलेल्या नेत्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये येत आहेत. अनेक मोठी घराणी भाजपमध्ये आली आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

पश्चिम महाराष्ट्र अथवा सांगलीतील अजून कोणते मोठे घराणे भाजपमध्ये यायचे आहे. प्रवेशाच्या प्रतीक्षेत कोणकोण आहेत? ‘करेक्ट कार्यक्रम’चे काय?, या पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “आम्ही प्रतीक्षेत आहोत, असे तुम्हाला वाटते. आतातरी आमच्या समोर असे काहीही चर्चेत नाही. जे मोठे घराणे यायचे होते ते आले आहे.”

चंद्रकांत पाटील म्हणाले, जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा प्रवेश आहे. वसंतदादा यांचे नेतृत्व, कर्तृत्व सर्वांना माहिती आहे. विष्णूअण्णा हे वसंतदादांचे पुतणे. त्यांनी राजकारण, सहकारात मोठे काम केले. मदन पाटील हे विष्णूअण्णा यांचे चिरंजीव. ते आमदार, खासदार, मंत्री होते. राजकारण, सहकारात त्यांनी चांगले काम केले. जयश्री पाटील याही राजकारण व समाजकारणात चांगले काम करत आहेत. अनेक संस्थांची जबाबदारी सांभाळत आहेत. जयश्री पाटील व कार्यकर्त्यांना भाजपकडून चांगले बळ मिळेल. कार्यकर्त्यांची काळजी घेतली जाईल.

काँग्रेसकडून अन्याय : जयश्री पाटील

जयश्री पाटील म्हणाल्या, मदनभाऊ यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी राजकारणात आले. गेल्या दहा वर्षांत काँग्रेसने मला व कार्यकर्त्यांना काय दिले हे सर्वांना माहिती आहे. नेहमी अन्यायच केला. विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर पक्षाने निलंबित केले. कोणत्या पक्षात जायचे याबाबत विचार केला. देवेंद्र फडणवीस यांना कामानिमित्त दोनदा भेटण्याचा योग आला. त्यांचे नेतृत्व, बोलण्याची पद्धत आवडली. ते सर्वांना बरोबरीने नेणारे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. सांगलीचा शेरीनाला यासारखे प्रलंबित प्रश्न तसेच वारणा उद्भव योजना मार्गी लावावी, ही मागणी आहे. सांगलीच्या विकासासाठी प्रयत्न करू.

तीन माजी महापौर, 11 माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये

जयश्री पाटील यांच्यासह किशोर शहा, किशोर जामदार, कांचन कांबळे हे तीन माजी महापौर तसेच प्रशांत पाटील, प्रशांत पाटील-मजलेकर दोन माजी उपमहापौर, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, शेवंता वाघमारे, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, मृणाल पाटील, माजी नगरसेवक करण जमादार, अजित सूर्यवंशी, प्रकाश मुळके, अजित दोरकर, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, उदय पाटील, सांगली शहर काँग्रेसचे सदस्य इरफान मुल्ला, सूरज मुल्ला, सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील जाधव, माजी उपसभापती प्रवीण पाटील, तानाजी पाटील (सलगरे) यांच्यासह सांगली, मिरज, कुपवाड तसेच मिरज पूर्व व पश्चिम भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यांनी घडवला चमत्कार..!

जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चांगल्याप्रकारे भूमिका निभावली. समित कदम, शेखर इनामदार, सम्राट महाडिक यांनीही विशेष प्रयत्न केले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश हा चमत्कार समित कदम व शेखर इनामदार यांनी घडवला. त्यांना आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांची साथ मिळाली, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT