माधवनगर : सांगली जिल्हा प्राथमिक सहकारी बँकेची सभा गोंधळात पार पडली. सभेत विरोधकांकडून फलक हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात आली, तर सत्ताधारी गटातून मंजूर - मंजूरच्या घोषणेतच सभा संपली. सभा बेकायदेशीर झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे, तर सभा नियमानुसार पार पडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
बँकेचे अध्यक्ष अशोक घागरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू होण्यापूर्वी शिक्षक समिती व विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाचे समर्थक दोन वेगवेगळ्या गटाने हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत सभागृहात आले. अध्यक्षांनी सभेचे विषय पत्रिकेचे वाचन केले. दोन मिनिटांत अध्यक्षांनी बारा विषय वाचून दाखविले. सत्ताधारी समर्थकांनी ते विषय दोन मिनिटात मंजूर - मंजूर अशा घोषणा देत मंजूर केले. सर्व विषय मंजूर झालेनंतर वंदे मारतम् होताच सभा संपल्याचे जाहीर केले. या गदारोळात शशिकांत बजबळे व आप्पासोा दळवी यांच्यासह काही सभासद सत्ताधारी समर्थकांनी खुर्च्या ओलांडत व्यासपीठाकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी समर्थकांनी तो हाणून पाडला.
सभेचे प्रत्यक्ष कामकाज सुमारे ३५ मिनिटे चालले. या काळात सभागृहातील तीन गट वेगवेगळ्या घोषणा देत होते. या घोषणाबाजीमुळे ते काय घोषणा देत आहेत तसेच सभेचे कामकाज नेमके काय चालले आहे ते कोणालाही कळत नव्हते. विरोधकांकडून सभागृहात सत्ताधारी गटाच्या विरोधकांनी अनेक फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली जात होती. या गदारोळात पोलिस अधिकारी असिफ सनदी यांनी सभागृहातील सभासदांना सध्याची जिल्ह्यातील आचारसंहितेची आठवण करुन दिली व शांततेचे आवाहन केले.
सभा संपताच दोन्ही गटाने सभागृहाबाहेर जाऊन समांतर सभा घेतल्या. शिक्षक समितीचे नेते शशिकांत बजबळे, सयाजी पाटील, रागिणी पाटील, शैलजा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली. सत्ताधाऱ्यांनी चार वर्षात त्यांच्या जाहीरनाम्याप्रमाणे व्याज दर कमी केला नाही अथवा लाभांश वाढवला नाही. निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून त्यांच्या जाहीरनाम्याची होळी केली.