सांगली पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रात खासगी दूधसम्राटांत दरवाढीची स्पर्धा सुरू झाली आहे. परराज्यांतील तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक खासगी डेअर्या शेतकर्यांच्या दुधाला जादा दर देत आहेत. सहकारातील 'पांढर्या दुधातील काळे बोके' मात्र मलई खाण्यात व्यस्त आहेत.
पाणी, चार्याची उपलब्धता यामुळे सांगली जिल्ह्यात दुधाचा महापूर कायमचा सुरू आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे 12 ते 15 लाख लिटर दुधाचे संकलन होते. हे दूध सहकारी, खासगी दूध डेअर्यांमार्फत संकलन केले जाते. पंधरा दिवसाला बिले काढली जातात, त्यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण यावर अवलंबून आहे. परंतु अनेक वर्षांपासून हे संकलन सहकारातील बोक्यांच्या हाती आहे. त्यामुळे दूधसम्राटांकडून योग्य दर न देता शेतकर्यांचे शोषण सुरू आहे. बायप्रॉडक्ट काढून मलई खाण्याबरोबर खाद्याचे दर मनमानी पद्धतीने वाढवून शेतकर्यांना लुटण्यातच दूधसम्राट मस्त आहेत.
याबाबत अनेक आंदोलने होऊन सहकारसम्राट शेतकर्यांना दरवाढ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. फारच मोठे आंदोलन झाले तर तुटपुंजी वाढ देऊन शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. ही दरवाढ खाद्य महाग करून पुन्हा शेतकर्यांच्या खिशातून काढून घेतली जाते. शेतकर्यांची गेली अनेक वर्षे अशी पिळवणूक सुरू आहे.
मागील एक-दोन वर्षांत मात्र याला काहीसा चाप बसू लागला आहे. कारण जिल्ह्यातील खासगी दूधसम्राट बलवान बनू लागले आहेत. त्यांना या व्यवसायातील नफा माहीत झाला आहे. त्यामुळे अनेक खासगी दूधसम्राट शेतकर्यांना जादा दर देऊ लागले आहेत. सध्या सहकारी डेअर्यांकडून म्हशीच्या सहा फॅट व 9 एसएनएफ दुधाला 40 ते 40.50 पैसे दर दिला जात आहे. तर गायीच्या 3.5 फॅट व 8. 5 एसएनएफ दुधाला 27 रुपये प्रतिलिटर भाव सहकारसम्राट देत आहेत. परंतु, काही खासगी दूधसम्राट म्हशीच्या दुधाला 41.50 ते 42 रुपये दर देत आहेत. तर गायीच्या दुधाला 30 ते 31 रुपये दर देत आहेत.
परराज्यातील अनेक मोठे खासगी दूध उद्योेग सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत. गुजरात, तामिळनाडू, आंधप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यातील अनेक खासगी डेअर्यांनी जादा दर देऊन संकलन सुरू केले आहे. पुढील आठवठ्यापासून आणखी दर वाढवून देण्याचे नियोजन स्थानिक व परराज्यातील दूध उद्योजकांनी केले आहे. यामुळे सहकारातील बोक्यांच्या मक्तेदारीला काही प्रमाणात शह बसू लागला आहे. याला अंतर्गत विरोध करण्याचे कारस्थान काही सहकारातील बड्या नेत्यांकडून सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात पश्चिम महाराष्ट्रात दूध वॉर होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील दूध व्यवसायात शेतकर्यांना उभे करण्याची प्रचंड मोठी क्षमता आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्यांना केवळ लुटण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही. आता काही खासगी व परराज्यातील बडे उद्योजक येथे आल्याने शेतकर्यांना एक-दोन रुपये जादा दर मिळतो आहे; परंतु तोही पुरेसा नाही. नफ्याच्या तुलनेत दुधाला आणखी दोन ते तीन रुपये दर जादा मिळू शकतो. त्यासाठी सरकारने शेतकर्यांच्या हिताची भूमिका घेतली पाहिजे. मात्र, सरकारमध्ये हेच लोक असल्याने या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. थोडीशी दरवाढ केली की लगेच खाद्य महाग करून शेतकर्यांच्या खिशातील पैसा काढून घेतला जातो.
– दिलीप पाटील, दूध व्यवसायातील अभ्यासक