दोन कि.मी.ची पायपीट करून दिला बाळाला जन्म 
सांगली

Sangli News : दोन कि.मी.ची पायपीट करून दिला बाळाला जन्म

बेंद्रीमधील घटना; ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नाने वाचले दोन जीव

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद चव्हाण

तासगाव : येरळा नदीकाठावरची अडचणीची, खाचखळग्यांनी भरलेली वाट, मुसळधार पाऊस आणि प्रसूती वेदनांनी व्याकुळ झालेली गर्भवती... अशा स्थितीत आरोग्य यंत्रणेच्या तत्परतेमुळे आणि जिद्दीमुळे या आदिवासी मातेला नवा जन्म मिळाला. बेंद्री (ता. तासगाव) येथील या घटनेत एका बाळाचा सुरक्षित जन्मही झाला. माता व बाळ दोघेही सुखरूप आहेत.

बेंद्री येथील कल्पना राजेश वाघमारे यांना ३ सप्टेंबर रोजी तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. काय करायचं, कोणाला संपर्क करायचा, काहीच समजत नव्हतं. त्यांनी गावातील आशा स्वयंसेविका विद्या कांबळे यांच्याशी संपर्क केला. त्या धावत वाघमारे यांच्याजवळ पोहोचल्या. झोपडी येरळा नदीकाठी होती. तिथं वाहन जाण्याची सोय नव्हती. तरीही कांबळे यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. पावसामुळं रस्ता चिखलानं भरलेला. रुग्णवाहिका थेट झोपडीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. कल्पना यांना तब्बल दोन किलोमीटर चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी चालत जाण्यास सुरुवात केली व दोन कि.मी. पायपीट करत त्या रुग्णवाहिकेजवळ पोहोचल्या आणि रुग्णवाहिकेतून त्यांना तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.

...पण अजूनही त्यांची परीक्षा संपली नव्हती. कल्पना यांना कितवा महिना सुरू आहे, हे त्यांना स्वतःलाच ठावूक नव्हतं. त्यांच्याकडं आधार कार्ड नव्हतं. त्यामुळं बाहेर सोनोग्राफी करणं शक्य नव्हतं. अशावेळी डॉ. तेजस किल्लेदार, डॉ. तानाजी पाटील आणि आरोग्य सेविका महानंदा बन्ने यांनी वेळेचे महत्त्व ओळखून रुग्णालयातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर, परिचारिका आणि आशा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि

कल्पना यांनी सुदृढ बाळाला जन्म दिला

पारंपरिक रूढींनुसार आदिवासी भागात अजूनही घरीच प्रसूती करण्याचे प्रमाण दिसते. मात्र, वेळेवर मिळालेला एक कॉल आणि आरोग्य यंत्रणेचा तातडीचा प्रतिसाद यामुळं दोन जीव सुरक्षित राहिले. आशा स्वयंसेविका विद्या कांबळे आणि तासगाव ग्रामीण रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे परिसरातून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT