शिराळा शहर : शिराळा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) वगळून भाजप, शिवसेना व मित्र पक्षांकडून शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक उमेदवार असतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिराळा येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, गौरव नायकवडी, ॲड. भगतसिंग नाईक, पृथ्वीसिंग नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामंत म्हणाले, महायुतीमध्ये समन्वय आहे. तशा वाटाघाटी आणि बोलणेही झाले आहे. जागा वाटपाबाबत दोन दिवसात स्थानिक पातळीवर निर्णय होईल.
आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा होऊन नगराध्यक्षपदी पृथ्वीसिंग नाईक यांचे नाव निश्चित केले आहे. विरोधकांनी खालच्या पातळीवर षडयंत्र रचून राजकारण सुरू केले आहे. स्वतःच्या पक्षाचे चिन्ह खुंटीला टांगून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. विरोधकांच्या संधीसाधूपणास मतदारच उत्तर देतील. आमचा घटक पक्षाशी चांगला समन्वय आहे. वरिष्ठांचा सन्मान व विनंतीचा मान राखून एकदिलाने यश संपादन करू.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, के. डी. पाटील, सम्राट शिंदे, विक्रम पाटील, नंदकुमार निळकंठ, सुखदेव पाटील, विक्रम पाटील, नीलेश आवटे, स्वप्निल निकम आदी उपस्थित होते.