आटपाडी: राजकारण विजय–पराभवापुरते मर्यादित नसते. कधी कधी ते माणसाच्या काळजावर उमटणाऱ्या भावनांचे, नात्यांच्या बंधनांचे आणि न सांगितलेल्या अश्रूंचेही असते. आटपाडी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत असेच एक दुर्मिळ, हृदय पिळवटून टाकणारे चित्र महाराष्ट्रासमोर आले.
एकाच घरातून, एकाच वेळी, सख्ख्या भाऊ–बहिणीने दोन वेगवेगळ्या रणांगणांत नगराध्यक्षपदासाठी उडी घेतली. निकाल मात्र वेगवेगळा लागला. आटपाडी नगरपंचायतीत भावाच्या पदरात पराभव पडला; पण त्याच क्षणी विठुरायाच्या पंढरीत बहिणीच्या गळ्यात नगराध्यक्षपदाचा हार पडला.
आटपाडीची लेक प्रणिता भालके हिने पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाचा मान पटकावत इतिहास रचला. तर आटपाडीच्या पहिल्याच नगरपंचायतीत नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरलेला लहान भाऊ पै. सौरभ पाटील निकालाच्या क्षणी हरला. एका घरात आनंदाचा जल्लोष होता, तर त्याच घरात शांतपणे स्वीकारलेली हारही होती.
विजयाच्या घोषणांनी पंढरी दुमदुमत असताना, आटपाडीत भावाच्या मनात वेदना होत्या; पण त्या वेदनांवर मात करत बहिणीच्या यशासाठी त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. स्वतः हरूनही बहिणीच्या विजयासाठी टाळ्या वाजवणारा भाऊ...हे दृश्य अनेकांना भावूक करून गेले. विशेष म्हणजे दोघांनीही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून लढत दिली होती. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे, तर भावनांची कसोटी ठरली. प्रणिता भालके या आटपाडीतील दिवंगत जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ पाटील यांच्या भावाची लेक असून, दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या सून आहेत. भारत नाना भालके यांच्या निधनानंतर त्या केवळ सून म्हणून नव्हे, तर त्यांच्या विचारांची आणि कार्याची वारसदार म्हणून पुढे आल्या
आज पाटील–भालके कुटुंबातील एक लेक विठुरायाच्या नगरीचे नेतृत्व करत आहे, तर दुसरा मुलगा आटपाडीच्या राजकारणात पराभवातून नवे बळ घेऊन उभा आहे. ही कहाणी कुणाच्या पराभवाची नाही, तर नात्यांच्या जिद्दीची, संस्कारांची आणि माणुसकीची साक्ष देणारी आहे. या निवडणुकीत शेवटी बहिणीने बाजी मारली; पण भावाच्या डोळ्यांत दिसलेला अभिमान सांगून गेला की...खरा विजय हा मतपेटीत नाही, तर नात्यांत जपलेल्या माणुसकीत असतो.