सांगली ःजिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची आज, शुक्रवारी (दि. 6) मुंबईत बैठक आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत जिल्ह्यातील नेते चर्चा करणार आहेत. महायुतीसोबत जायचे, की महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा, याबाबत एकमत होत नाही. त्यामुळे बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 18 मार्चला होणार आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हा परिषदेचे सहा सदस्य आहेत. या सदस्यांची भूमिका सत्तास्थापनेत निर्णायक असणार आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र पक्षातील अनेक नेत्यांचा महाविकास आघाडीसोबत जाण्यास आग्रह आहे, तर युतीला पाठिंबा द्यावा, असेही काहीचे म्हणणे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्यासोबत बैठकीत अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी आ. शिवाजीराव नाईक यांनी तटकरे यांची भेट घेतली होती. मात्र जिल्ह्यातील सर्व नेत्यांना बरोबर घेऊन निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार मुंबईतील बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी खा. संजय पाटील, माजी आ. शिवाजीराव नाईक, माजी आ. अजितराव घोरपडे, माजी आ. विलासराव जगताप, माजी आ. राजेंद्र देशमुख उपस्थित असणार आहेत. मात्र ‘पक्ष काहीही आदेश देऊ देत, आम्ही कोणासोबत जायचं हे आमचं ठरलंय’, अशीही काही सदस्यांनी भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
सत्तास्थापनेत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र शिंदे शिवसेनेचा पाठिंब्याबाबत निर्णय होत नसल्याचे दिसत आहे. तसेच या पक्षातील नेतेही काही प्रतिक्रिया देत नाहीत. त्यामुळे त्यांचा पाठिंबा नेमका कोणाला असणार , हा प्रश्नच आहे.