ईश्वरपूर : राजकीय आकस आणि द्वेषापोटी ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्याविरोधात विरोधकांनी कुभांड रचले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी निर्णय देऊन नगराध्यक्ष मलगुंडे यांना अपात्र ठरवले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श. प.) नगरसेवकांनी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येथे आयोजित पत्रकार बैठकीत केला.
जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय म्हणजे ईश्वरपूरच्या मतदारांचा अपमान असून पक्षाच्यावतीने आम्ही याचा तीव्र निषेध करतो. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. सर्व नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी नगराध्यक्ष मलगुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, गटनेत्या अरुणादेवी पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक विजय कुंभार, महेश पाटील, नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, एल. एन. शहा, संग्राम दि. पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, शंकरराव चव्हाण, संदीप माने आणि पुष्पलता खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे म्हणाले, तीन दशके नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आणि जनतेने नगराध्यक्ष पदाची धुरा सोपवली. मी माझ्या कार्यकाळात कुठेही अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण केलेले नाही. ज्या जागेबद्दल तक्रार करण्यात आली आहे, ती जागा २००२ पासून २०१६ पर्यंत नातेवाईकांच्या नावावर होती. त्यानंतर आम्ही बक्षीसपत्राद्वारे ती जागा घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास न करता, तसेच कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता निर्णय देऊन अन्याय केला आहे.
शहाजी पाटील म्हणाले, आनंदराव मलगुंडे यांना शहरवासीयांनी प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. मात्र, विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून घेतलेला अपात्रतेचा निर्णय शहरातील जनतेचा अपमान करणारा आहे. उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव म्हणाले, न्याय देताना दोन्ही बाजूंचा विचार करायचा असतो; पण या प्रकरणात केवळ राजकीय दबावाला बळी पडून एकतर्फी निर्णय दिला गेला. नगराध्यक्ष मलगुंडे यांच्या जागेचे २००२ सालीच गुंठेवारी नियमितीकरण झालेले असताना हा कायदा कसा लागू होऊ शकतो? निर्णय देणारेच आता राज्य शासनाकडे दाद मागायला सांगत आहेत, असे कधीही घडले नव्हते.
विजय कुंभार यांनी सांगितले की, १२ वर्षांनंतर कोणतीही मालमत्ता बेकायदेशीर राहत नाही, मग २४ वर्षांपूर्वीचा विषय आता कसा आणला? अतिक्रमण आणि अपात्रतेचा निर्णय या बाबी एकमेकांशी विसंगत आहेत. गटनेत्या अरुणादेवी पाटील म्हणाल्या, राज्यात इतके महत्त्वाचे विषय प्रलंबित असताना हा निर्णय इतक्या झटपट कसा दिला गेला? उमेदवारी अर्ज छाननीच्यावेळी हा उमेदवार पात्र ठरतो आणि आता अचानक अपात्र कसा होऊ शकतो?
नगरसेवक संग्राम दि. पाटील म्हणाले की, मलगुंडे हे शहरातील जनतेच्या मनातील लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. त्यांची बदनामी आम्ही कधीही खपवून घेणार नाही. सर्व नगरसेवक आणि शहरातील जनता त्यांच्या पाठीशी आहे. संग्राम पाटील म्हणाले की, प्रशासनाने लोकभावनेचा अनादर करून एकप्रकारे अराजकतेला आमंत्रण दिले आहे.
या बैठकीला नगरसेवक शिवाजी जाधव, जावेद इबुशे, स्वरूप मोरे, सचिन हांडे, सचिन कोळी, सुप्रिया पाटील, सविता आवटे, शुभांगी शेळके, मनीषा कुरळपकर, लता कुर्लेकर, पल्लवी नागे, रेखा जाधव, संध्या कांबळे, तसेच निवास पाटील, बाळासाहेब कोळेकर, आयुब हवलदार, अभिजित कुर्लेकर, अंगराज पाटील, भूषण शहा, विजय देसाई आणि राजू अडसूळ उपस्थित होते.