सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घोळ सुरूच होता. सर्वच राजकीय पक्षांकडून गट आणि गणांसाठी उमेदवार निश्चित करण्यावर खलबते झाली; मात्र काही गट आणि गणांतील तोडगा निघाला नाही. त्यामुळे भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, जनसुराज्य शक्ती, रयत क्रांती संघटनेकडून अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी बिघाडी झाली आहे. अर्ज माघारीनंतर खरे चित्र समोर येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेची खरी लढत सुरू होणार आहे.
वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होईल, तर खानापूर, आटपाडीत भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना, तर कवठेमहांकाळला महायुती विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, तासगावमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी तिरंगी, तर जतमध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय लढत होईल, अशी सध्या तरी चिन्हे आहेत.
उमेदवार फायनल करण्यासह आघाडी, युतीबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या बैठकांचे गुऱ्हाळ मंगळवारपर्यंत सुरूच होते. उमेदवारी यादी जाहीर न करता महानगरपालिकेप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांनी सकाळी अकरानंतर थेट एबी फॉर्म दिले. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असताना उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. काही तालुक्यांत महायुती आणि महाविकास आघाडीत फूट पडल्याचे उमेदवारी अर्जांतून सध्या तरी दिसत आहे. वाळवा तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. बोरगाव गटात काँग्रेस अणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीत फूट पडली.
शिराळा तालुक्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भाजपाने उमेदवारांचे अर्ज भरले आहेत. भाजपसोबत शिंदे सेनेने हातमिळवणी केली आहे. मिरज तालुक्यात भाजप विरुद्ध सर्वपक्षीय लढत होण्याची शक्यता आहे. जनसुराज्य पक्षानेही उमेदवार उभे केले आहेत. पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात भाजपचे माजी आ. पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्यात समझोता झाला. तेथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल. काँग्रेस नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांनी भाजपला जोरदार आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
खानापूर-आटपाडी तालुक्यात महायुतीत फूट पडली. खानापूर तालुक्यात भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना अशी लढत होत आहे. आटपाडीत भाजपविरोधात शिंदे शिवसेना अशी लढत होत आहे. अजितदादा गट शिंदे सेनेसोबत राहणार असल्याचे बोलले जाते. जत तालुक्यात भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडीत सामना होईल. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीचे नेते माजी आ. विलासराव देशमुख यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन भाजपविरोधात आघाडी केली आहे. तासगाव तालुक्यात आ. रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यात लढत होणार आहे. भाजपकडून स्वतंत्र उमेदवार देण्यात आले आहेत.
तासगाव आणि वाळवा तालुक्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विरोधात इतर पक्ष अशी लढत होणार आहे. वाळव्यात आ. जयंत पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्याविरोधात भाजप, शिंदे सेना, अजितदादा गट आणि काँग्रेस असे सर्व पक्ष एकवटले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात अजितदादा राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. बहुसंख्य गट आणि गणांत बंडखोरी झाली आहे, त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांचा कस लागणार आहे. अर्ज माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.